बहुरूपी मुलाच्या शिक्षणासाठी ‘खाकी’चा पुढाकार!
By Admin | Updated: April 17, 2016 23:27 IST2016-04-17T21:14:59+5:302016-04-17T23:27:19+5:30
पोलिसांतील माणुसकी : लातूरचा सुरेश आता कऱ्हाडात शिकणार; गावोगावची भटकंती अखेर थांबली

बहुरूपी मुलाच्या शिक्षणासाठी ‘खाकी’चा पुढाकार!
कऱ्हाड : शब्दांचे खेळ करणं ही बहुरूपींची खासियत. वेगवेगळे पोषाख परिधान करून हे बहुरूपी समाजातील लोक गावोगावी फिरतात. पोटाशी लोककला बिलगली असली तरी या कलेतून पोट भरणं मुश्किल. असाच एक बहुरूपी समाजातील मुलगा ‘खाकी’ परिधान करून चक्क कऱ्हाडच्या पोलिस ठाण्यात धडकला. खऱ्याखुऱ्या पोलिसांना ‘आत’ टाकण्याची पोकळ धमकीही त्याने दिली. त्याच्या या शब्दरूपी खेळाचं पोलिसांनाही अप्रूप वाटलं; पण शिकण्याच्या वयात पोट भरण्यासाठी सुरू असलेली त्याची ही धडपड पोलिसांच मन हेलावून गेली. अखेर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या मुलाचा बहुरूपी पोषाख उतरवला. तसेच त्याला शिक्षणाची दारेही खुली करून दिली. सुरेश शंकर शेगर असं त्या बहुरूपी मुलाचं नाव. सुरेश हा मूळचा लातूर जिल्ह्यातील मुरूड गावचा. लोककला हा त्याला घरीच मिळालेला वारसा. त्याचे वडील बहुरूपी. गावोगावी फिरायचे. ग्रामस्थांचे मनोरंजन करायचे. वेगवेगळे पोषाख आणि वेगवेगळ्या नकलांतून ते जनजागृती करायचे. आज एका तर उद्या दुसऱ्या गावात. वर्षातील बाराही महिने या कुटुंबाची भटकंती सुरू असायची. लहाणपणापासून सुरेशनं ही बहुरूपी कला जवळून पाहिली. मात्र, या कलेत त्याला म्हणावा तेवढा रस नव्हता. कधी-कधी वडील पाठमोरं होताच, तो त्यांची नक्कल करायचा. मात्र, आपण बहुरूपी व्हावं, असं त्याला कधीच वाटलं नाही. घरात खाती तोंड जास्त. कमावते फक्त वडील आणि सुरेशचा मोठा भाऊ. सुरेशचं चौथीपर्यंतचं शिक्षण गावातीलच शाळेत झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो बीडच्या परळी तालुक्यातील वैजनाथ गावी गेला. त्याठिकाणी शिवछत्रपती विद्यालयात तो सातवीपर्यंत शिकला. सध्या शाळेला उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आई, वडिलांसोबत सुरेशनं भटकंती सुरू केली. सध्या हे कुटुंब कऱ्हाडनजीकच्या ओगलेवाडीत वास्तव्यास आहे. रस्त्यानजीकच या कुटुंबाची झोपडी असून, वडिलांबरोबरच सुरेशही कमावता झाला. त्यानेही गावोगावचे रस्ते तुडवत कला सादर करण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी सुरेश पोलिसांचा पोषाख परिधान करून कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याठिकाणी त्याने शब्दांचे खेळ करण्यास सुरुवात केली. सुरेशकडून होणारी शब्दांची फेकाफेकी आणि अभिनय यामुळे शाब्दिक व वस्तुनिष्ठ विनोद तयार झाले. त्याची ही कला पोलिसांना भावली. मात्र, शिक्षण घेण्याच्या वयात ही धडपड कशासाठी, असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला. त्यांनी सुरेशशी चर्चा केली. त्याची कौटुंबिक स्थिती जाणून घेतली. तसेच सामान्यज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले. सुरेशने त्या सर्व प्रश्नांना अचूक आणि चपखलपणे उत्तरे दिली. त्याची ही हुशारी पाहून पोलिसही भारावले. त्यांनी त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्याची शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली.
सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, विवेक पाटील तसेच गुन्हे शाखेचे प्रभाकर घाडगे, संदेश लादे, अमित पवार हे सर्वजण सुरेशला बाजारपेठेत घेऊन गेले. तेथे नवीन कपडे खरेदी केले. तसेच दैनंदिन गरजेच्या व शैक्षणिक वस्तूही खरेदी करून त्याला देण्यात आल्या. आता सुरेशच्या यापुढील शिक्षणाची जबाबदारी या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्याबाबत त्यांनी सुरेशच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली असून, त्याला कऱ्हाडातीलच शाळेत दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)