‘खाकी’नं वाजविला ‘डॉल्बीचा बँडबाजा’!
By Admin | Updated: August 9, 2016 23:55 IST2016-08-09T23:19:36+5:302016-08-09T23:55:02+5:30
पोलिस मोजणार ध्वनीतीव्रता : नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार; जिल्ह्यात सर्वत्र राहणार पोलिसांचा ‘वॉच’

‘खाकी’नं वाजविला ‘डॉल्बीचा बँडबाजा’!
सातारा : गणेशोत्सवात डॉल्बी वाजविल्याने होत असलेल्या ध्वनीप्रदूषणासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आवाज गावाचा, नाय डॉल्बीचा’ ही चळवळ उभारली होती. याला लोकांनी पाठिंबा दिल्याने ती ‘लोकचळवळ’ बनली. याच्या कडक अंमलबजावणीसाठी सातारकरांचे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.
जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी यंदा ‘डॉल्बी’चा बॅण्डबाजा वाजविण्याचा निर्धार केला आहे. फलटणमध्ये तर यापूर्वीच कारवाई करून भूमिका सिद्ध करून दाखविली आहे. (प्रतिनिधी)
दणदणाट करणाऱ्या मंडळांवर कारवाई!
कऱ्हाड : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकाचा होणारा अतीवापर नवीन नाही; पण डॉल्बीची थापी रचून दणदणाट करणाऱ्या मंडळांची संख्या सध्या भलतीच वाढली आहे. हा दणदणाट रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न झालेत. मात्र, तरीही काही अतीउत्साही कार्यकर्त्यांना समज आलेली नाही. त्यामुळे यावर्षीही पोलिस दलाने कडक धोरण अवलंबले असून ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतलाय.
गणेशोत्सव कालावधीत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जातात. ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र, सध्या बंदोबस्ताबरोबरच पोलिसांना मंडळांच्या ध्वनीतीव्रतेवरही लक्ष केंद्रित करावे लागत आहे. मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदरच पोलिसांकडून हालचाली केल्या जात आहेत. शांतता समिती, गुन्हे नियंत्रण समिती तसेच गणराया अॅवॉर्ड समितीची बैठक घेतली जात आहे. त्या बैठकीत ध्वनी मर्यादेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तसेच सर्व संघटना, गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना त्याबाबत सूचनाही केल्या गेल्या आहेत. मात्र, एवढे करूनही अनेकवेळा मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जाते. न्यायालयाच्या निर्देशानुसार क्षेत्रनिहाय ध्वनीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास यापूर्वी पोलिसांकडून संबंधित मंडळाला समज देण्यात येत होती. कधीकधी दंडात्मक कारवाईही व्हायची; पण तरीही ध्वनी तीव्रतेबाबत मंडळांकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सध्या पोलिसांनी कडक धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)