खाकी हेल्मेटविना अन् गाडी बेल्टविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 21:38 IST2015-08-20T21:38:39+5:302015-08-20T21:38:39+5:30
अधीक्षकांनी उगारला बडगा : पोलीस कर्मचाऱ्यांना दंड न केल्यास ट्रॅफिक हवालदारांवरच होणार कारवाई --लोकमत विशेष

खाकी हेल्मेटविना अन् गाडी बेल्टविना!
दत्ता यादव - सातारा सुरक्षिततेचे धडे सर्वसामान्यांना देणारे पोलीस जेव्हा स्वत:च कायदा पायदळी तुडवतात तेव्हा सर्वसामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा, अशी परिस्थिती सातारच्या पोलिसांकडे पाहिल्यावर वाटते. बुधवारी दुपारी ‘लोकमत टीम’ने शोध घेतल्यानंतर अनेक पोलीस कर्मचारी सीटबेल्टविना फोरव्हिलर आणि हेल्मेटविना दुचाकी चालवत असल्याचे दिसून आले. सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या हेल्मेट सक्तीला पोलिसांनीच कोलदांडा दिल्याचे स्पष्ट झाले.
कोणात्याही नियमाची सुरुवात स्वत:पासून केल्यास आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला चार गोष्टी चांगल्या सांगता येतात, असे म्हटले जाते. त्यामुळे या नियमाला पोलीसही अपवाद नाहीत. सुरक्षिततेचे नियम तोडणाऱ्यांवर पोलीस ‘दात खाऊन’ कारवाई करतात; मात्र हेच नियम पाळण्याची वेळ ज्यावेळी पोलिसांवर येते, तेव्हा त्यांची सर्वसामान्य नागरिकांसारखीच अवस्था होते. बरेच पोलीस सीटबेल्टविना गाडी चालवत असतात; मात्र गाडीवर असलेल्या ‘पोलीस’ या शब्दामुळे व अंगात असलेल्या खाकी वर्दीमुळे त्यांना यातून सूट मिळते. जनेतला सुरक्षिततेचे धडे देण्यापूर्वी आपण स्वत: नियम पाळले पाहिजेत, यासाठी सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलिसांना हेल्मेटसक्ती केली. काही दिवस पोलिसांनी हे नियम काटेकोरपणे पाळले; परंतु या आदेशाचा विसर पडताच सीटबेल्ट आणि हेल्मेटविना पोलीस प्रवास करू लागले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने गुरुवारी शहरात ठिकठिकाणी शोध घेतला. तेव्हा या सर्व गोष्टी उघडकीस आल्या. ज्या पोलीस मुख्यालयातून हेल्मेटसक्तीचा आदेश निघाला. त्याच मुख्यालयातून हे नियम मोडून पोलीस बिनधास्त बाहेर येत होते. काही मोजक्याच पोलिसांनी हे नियम पाळल्याचे पाहायला मिळाले. पोलीस करमणूक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका, राधिका रस्ता या ठिकाणी पोलीस हेल्मेटसक्तीचा नियम मोडताना दिसले.
जाऊ द्या; आपलाच माणूस आहे...
एखादा पोलीस दुचाकीवरून हेल्मेट न घालता निघाल्यास त्यांचेच सहकारी त्यांना शिट्टीचा आवाज देऊन थांबवतात; मात्र काहीक्षण त्या पोलीस कर्मचाऱ्याला आपल्यालाच शिट्टी मारली आहे, याचा विश्वास बसत नाही. ‘‘आपलाच सहकारी आहे. मला कशाला थांबवेल,’ असा त्यांचा समज असतो; मात्र तरीही वाहतूक पोलिसांनी साहेबांच्या आदेशानुसार तुम्हाला दंडाची पावती फाडावी लागेल,’ असे सांगतातच. ‘काय राव.. आपल्याच माणसाला पावती फाडावी लावताय; जाऊ द्या ना आता,’ अशी विनंती केली जाते.
अनेक गाड्यांना सीटबेल्ट नाहीत !
सध्या पोलिसांकडे असलेल्या अनेक गाड्यांना सीटबेल्ट नसल्याचे दिसून आले. जुन्या गाड्यांची ही परिस्थिती आहे. परंतु नवीन गाड्यांना सीटबेल्ट आहेत. तरी सुद्धा पोलीस सीटबेल्ट लावण्याचा कंटाळा करतात. एकवेळ हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलिसांवर दंडात्मक कारवाई होईल; मात्र सीटबेल्ट लावला नाही म्हणून कारवाई होईल, हे सांगता येत नाही. कारण सीटबेल्ट लावला नाही म्हणून आर्वजून एखादी पोलीस गाडी आडवण्यात आली आहे. असे कधीच कोणाला पाहायला मिळाले नाही.
कानाडोळा केल्यास पोलिसांवर होणार कारवाई !
सीटबेल्ट व हेल्मेटविना गाडी चालविणाऱ्या आपल्या सहकार्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास वाहतूक पोलीसच आता अडचणीत येणार आहेत. तसा आदेश सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना काढला आहे. त्याची पत्र महितीसाठी पोलीस अधीक्षकांनाही पाठविण्यात आली आहे. अधिकारी व पोलीस जवानांवर कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास कसुरी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता प्रत्येक पोलिसाच्या डोक्यावर सातारकरांना हेल्मेट पाहायला मिळेल.
३० जणांवर कारवाई
करून केला ‘श्रीगणेशा’ !
पोलीस अधीक्षकांनी पोलिसांसाठी हेल्मेटसक्तीचा आदेश दिल्यानंतर वाहतूक शाखा कार्यरत झाली. अधूनमधून कारवाई करून वाहतूक पोलिसांनी आपल्या सहकार्यांनाच दंड करून कारवाईचा ‘श्रीगणेशा’ केला. आत्तापर्यंत ३० पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.