खाकी रंगली निवडणूकरंगात!
By Admin | Updated: April 3, 2015 00:41 IST2015-04-02T23:20:34+5:302015-04-03T00:41:32+5:30
प्रचाराला वेग : पोलिसांच्या पतसंस्थेची रविवारी निवडणूक

खाकी रंगली निवडणूकरंगात!
सातारा : निवडणुकांचा आणि पोलिसांचा संबंध केवळ बंदोबस्तापुरताच येतो; मात्र आता खाकीही निवडणुकीच्या रिंगणात रंगून गेली आहे. मतदान केंद्रांभोवती संरक्षणासाठी उभे राहणारे पोलीसदादा येत्या पाच तारखेला नखाला शाई लावतील. पोलिसांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक तोंडावर असून, पोलिसांच्या तोंडून बंदोबस्ताऐवजी प्रचाराचे अनुभव ऐकायला मिळत आहेत.
पॅनेलच्या जुळणीपासूनच पोलिसांची लगबग आणि उत्साह दिसून आला. बंदोबस्तावर बाहेर पाठवले, तरी संबंधित चौकीतील कर्मचाऱ्यांमध्ये आपला आणि आपल्या पॅनेलच्या उमेदवाराचा प्रचार करताना पोलीस सध्या दिसत
आहेत.
सापळा रचणे, आरोपी पकडणे, बंदोबस्तासाठी धावणे, आरोपीला कोर्टात हजर करणे, कोठडी वाढवून घेणे अशी ठाशीव भाषा तोंडी असलेले पोलीस ‘लक्ष असू द्या,’ हे टिपिकल राजकीय वाक्य उच्चारताना दिसत आहेत. प्रचारक्षेत्र मर्यादित असले तरी राजकीय व्यक्तींप्रमाणेच आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. कोण चांगला, कोण वाईट यावर चर्चा रंगल्या आहेत. पतसंस्था कोणाच्या हातात दिली असता ती अधिक कार्यक्षमतेने चालेल, यावरही पोलिसांमध्ये गप्पा रंगल्या आहेत.
सामान्यत: पतसंस्थांच्या निवडणुकीत जे मुद्दे गाजतात, तेच याही निवडणुकीत गाजत आहेत. त्यात कर्जाची मर्यादा वाढविणे आणि व्याजाचा दर कमी करणे हे सभासदांना सुखावणारे निर्णय घेण्याचा वादा केला जात आहे. तसेच पतसंस्थेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची आश्वासनेही दिली जात आहेत. ‘शिक्षकांची बँक आहे तर पोलिसांची का नसावी,’ अशी वाक्ये फेकली जात आहेत.
पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलीस सहकारी पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असायचे, तर उपअधीक्षकांकडे चेअरमनपद होते. सहकार कायद्यातील दुरुस्तीमुळे पतसंस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि हालचालींनी वेग घेतला. या पतसंस्थेची सदस्यसंख्या १५ असून, त्यामध्ये महिला व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खुल्या
गटातील १२, भटक्या विमुक्तांच्या १ आणि अनुसूचित जातीजमाती प्रवर्गाच्या दोन जागांसाठी निवडणूक आहे.
प्रगती पॅनेलचे शेखर कडव, रवींद्र आहेरराव, किसन कारंडे, पृथ्वीराज घोरपडे, सागर जमादार, प्रवीण घाडगे, राजेंद्र सावंत, राजू आहेरराव, शशिकांत जाधव, लक्ष्मण सावळकर, श्रीकांत सोनावणे, ज्योतिराम बर्गे रिंगणात आहेत. दुसरीकडे कांतिलाल नवघणे, शेखर मंगवाने, कैलास शिंदे, जनार्दन खंडागळे, बाबासाहेब धर्मे आदी मंडळी निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.
निवडणूक चुरशीची झाली असून, या निमित्ताने पोलीस ठाण्यांच्या परिसरात वेगळीच वातावरणनिर्मिती झाली आहे. (प्रतिनिधी)