विंग ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदावरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:55+5:302021-09-12T04:44:55+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून खडाजंगी झाली. अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले ...

विंग ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदावरून खडाजंगी
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून खडाजंगी झाली. अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते. मात्र, विचारविनिमयानंतर आनंदराव खबाले यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. २४ बाय ७ मीटरला नळजोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नळ कनेक्शन बंद करण्याच्या ठरावासह विविध ठराव सर्वानुमते घेण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाल्याने तब्बल दोन वर्षांनंतर सरपंच शुभांगी खबाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. दोन अर्ज आल्याने निवडीवर पेच निर्माण झाला. परिणामी निवडीवरून खडाजंगी झाली.
विचारविनीमयातून जयवंत पाटील यांनी माघार घेतल्याने आनंदराव खबाले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून विकास होगले यांची निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित खबाले व होगले यांचा सत्कार करण्यात आला. २४ बाय ७ घरगुती नळकनेक्शन मीटर जोडली आहेत. मात्र, मीटरपुढे नळजोडणी केलेली नाही. प्लंबिंग नाही. त्यामुळे पाणीचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थिक मोठे नुकसान होत आहे. हा आकडा दरमहा ५० हजार एवढा आहे. त्या मुद्द्यावरून संबंधित ग्राहकाचे नळकनेक्शन बंद करा, असा ठराव सर्वांनुमते घेण्यात आला. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या परवानगीने येथील गायरान जागेत बहुउद्देशीय क्रीडांगण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
विविध विकास कामांसह ग्रामपंचायत थकित कर वसुली, १५ वा वित्त आयोग विकास आराखडा, सौरऊर्जा प्रकल्प, दारूबंदी आदी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा यावेळी झाली. जि. प. सदस्य शंकरराव खबाले, प्राध्यापक हेमंत पाटील, बाबूराव खबाले, संजय खबाले, बबनराव शिंदे, शंकर ढोणे, रमेश खबाले, राजेंद्र खबाले, संपत खबाले यांनी चर्चेत सहभाग घेतला. सदस्या दीपाली पाटील, अश्विनी माने, प्रियांका कणसे, साधना कणसे, पूनम डाळे, संतोष कासार-पाटील, ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी प्रास्ताविकात प्रोसिडिंग वाचन केले.