रिकाम्या जागा भरण्यासाठीच केलीय उठाठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:56+5:302021-03-16T04:39:56+5:30

सातारा : भौतिकशास्त्र आणि गणित हा अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा पाया आहे. या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकीला प्रवेश भविष्यात अनेक अडचणी ...

Keliya Uthatheva to fill in the blanks | रिकाम्या जागा भरण्यासाठीच केलीय उठाठेव

रिकाम्या जागा भरण्यासाठीच केलीय उठाठेव

सातारा : भौतिकशास्त्र आणि गणित हा अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा पाया आहे. या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकीला प्रवेश भविष्यात अनेक अडचणी आणून ठेऊ शकतो. निव्वळ खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचा आक्षेप साताऱ्यातील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभ्यासक्रमाच्या २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र बंधनकारक नसल्याची तरतूद नियमावलीत केली आहे. विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकीची भीती दूर होण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. केवळ रिक्त जागा भरण्यासाठी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नुकसानकारक असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया आहेत. जर हेच विषय अनिवार्य नसतील तर हा अभ्यासक्रम शिकून किती विद्यार्थी प्रत्यक्ष काम करू शकतील आणि केलेले काम किती निर्दोष असेल याबाबत मोठं प्रश्न चिन्हं उभं राहणार आहे.

असे असणार नवीन नियम

अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल, अ‍ॅग्रीकल्चर, इंजिनियरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडिज, आंत्रप्रिनियरशिप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले आणि बारावीत या तीन विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण असले तर अभियांत्रिकीला सहज प्रवेश घेणं शक्य होणार आहे.

कोट :

या निर्णयामुळे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न मिटेल. मात्र, अभियांत्रिकीचा पाया असलेले विषयच वगळले तर पदवी हातात असूनही नोकरी आणि कामाची संधी मिळणं केवळ अशक्य वाटतंय.

- विशाल ढाणे, अभियांत्रिकी शिक्षक

अभियांत्रिकी क्षेत्रात कोणतंही स्ट्रक्चर डिझाईन करताना गणिताचा उपयोग होतो. अकरावी बारावीत हे विषय असतील तर विषय लक्षात येऊ शकतात. थेट पहिल्या वर्षाला हे विषय शिकवू असं म्हटलं तर त्याचा विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो.

- प्रा. संजीव बोंडे, सातारा

Web Title: Keliya Uthatheva to fill in the blanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.