दरड कोसळून केळघर घाट ठप्प
By Admin | Updated: July 31, 2014 23:24 IST2014-07-31T23:04:02+5:302014-07-31T23:24:22+5:30
धो-धो पाऊस : जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळीसह पाच धरणांतून सोडले पाणी

दरड कोसळून केळघर घाट ठप्प
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागाला आज, गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. केळघर घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर-मेढा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर धरणांतून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील केळघर घाट (काळाकडा) येथील दरड सकाळी सहाच्या सुमारास कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे महाबळेश्वरच्या दिशेने येत असलेल्या एस.टी.तील प्रवाशांनी फोन करून याची माहिती महाबळेश्वर व मेढा पोलिसांना दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आठनंतर जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली. तब्बल पाच तासांनंतर कोसळलेली दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत वाहतूक थांबविण्यात आली होती. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत.
पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ६.१२ टीएमसीने पाणी वाढले. संगमनगर धक्का पूल आज दिवसभर पाण्याखाली होता. धरणात ६७.६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
२४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयना १९९, नवजा २२०, महाबळेश्वर २८०.
तालुक्यातील नदी, ओढे व मध्यम प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. कोयना धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. धरणात ५३,६९५ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)