कातरखटावमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:35+5:302021-08-27T04:42:35+5:30
कातरखटाव : कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील चोरट्यांनी पाच बंद दुकाने फोडली असून, एक हजाराच्या रोख रकमेसह ३३,२०० रुपयांची ...

कातरखटावमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडली
कातरखटाव : कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील चोरट्यांनी पाच बंद दुकाने फोडली असून, एक हजाराच्या रोख रकमेसह ३३,२०० रुपयांची चांदी व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरज-भिगवण राज्य महामार्गावरील सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील महालक्ष्मी हार्डवेअर, श्रीराम ज्वेलर्स, प्रियंका ज्वेलर्स, सतीश ज्वेलर्स आदींसह एका देशी दारूच्या दुकानांत मंगळवारी रात्री दोनच्यासुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये तरसवाडीचे दत्तात्रय पवार यांच्या कातरखटाव येथील श्रीराम ज्वेलर्सचे शटर उचकटून ३२० ग्रॅमचे पैंजण, चार ग्रॅम सोने असा एकूण ३१२०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच सतीश ज्वेलर्स यांच्या दुकानाची कडी तोडून गळ्यातील ताईतपेटी, चांदीच्या राख्या व पन्नास चांदीच्या लहान देवाच्या मूर्ती असा एकूण २००० रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच महालक्ष्मी हार्डवेअरचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील एक हजार रुपये रोख व किरकोळ साहित्य चोरून नेले. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रियांका ज्वेलर्स या दुकानाकडे वळविला. या दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. नंतर गावच्या पूर्व बाजूकडील नरवणे रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानाचे शटर उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण पाच दुकाने फोडून चोरट्यांनी एक हजाराच्या रोख रकमेसह ३३२०० रुपयांचे चांदीचे व सोन्याचे दागिने लंपास केले.
सकाळी चोरीची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सातारा येथूल अंगुली मुद्रा ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले व चोरीच्या ठिकाणचे ठसे घेतले. या गुन्ह्याची वडूज पोलिसात नोंद झाली असून, वडूजचे पोलीस उपनिरीक्षक मालोजीराजे देशमुख पुढील तपास करीत आहेत. या चोरीमुळे कातरखटाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावचे पोलीसपाटील घनशाम पोरे यांनी दुकानदारांना सीसीटीव्ही बसविण्याचे आव्हान केले आहे.
फोटो - कातरखटाव येथील श्रीराम ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. (छाया : विठ्ठल नलवडे )