कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:04+5:302021-04-23T04:41:04+5:30

कातरखटाव : कातरखटाव परिसरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३४० जणांना ...

Katarkhatav Primary Health Center on Saline! | कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर!

कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर!

कातरखटाव : कातरखटाव परिसरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३४० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, वडूज शहरासह, कातरखटाव, तडवळे, एनकूळ, येरळवाडी, बोबाळे ही गावे व खेडीपाडी हॉट स्पॉट बनली आहेत. १ एप्रिल ते आजअखेर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

कातरखटाव परिसरातील परिस्थिती पाहता, बाधित रुग्ण काळजी न घेता घरात बसण्याऐवजी घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून जनता कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे संसर्गाचा प्रसार वाढत आहे. प्रशासन कर्तव्य बजावत नसल्यामुळे संख्या कमी होण्याऐवजी दिवसा-दिवसाला मोठे आकडे ऐकायला मिळत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगाने आपले पाय पसरत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कोरोना विषाणूने मागील काही दिवसांपासून खेड्यापाड्यात वेगाने शिरकाव केला असून, आता ग्रामीण भागातील रुग्णांची व दगावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णालयात चाचणी करून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळू लागल्याने आरोग्य केंद्र कोरोना विस्फोटाचे ठिकाण ठरत आहे. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठा ताण येत असून, लसीकरण आतल्या बाजूला आणि रुग्णांची टेस्ट बाहेर, त्यामुळे अक्षरशः आवारात दोन-दोन तास उभे राहिले तरी रुग्णांची चाचणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

अजून किती अशा कोरोनाच्या लाटा येणार... आणि रोजंदारीवर पेटणाऱ्या चुलीवर पाणी पडणार... आजमितीला ही परिस्थिती असून सामान्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. शासनदरबारी लॉकडाऊनच्या खेळात रोजंदारीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे मोठ्या संकटात सापडले आहेत. ना काम ना धंदा, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण बनला आहे.

एकंदरीत नागरिकहो ‘मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित’, हे लक्षात असू द्या. घरीच बसा. कारण प्रशासन हतबल झालं आहे. गतवर्षीप्रमाणे प्रशासन ना सर्व्हे करतेय, ना आरोग्य खाते फिरतेय... ना पोलीस पथक येतंय ना ग्रामपंचायत समिती दखल घेतंय... ना कंटेन्मेंट झोन, ना बफर झोन. कुठल्याही प्रशासनाला काहीही पडलेले नाही. त्यामुळे सूज्ञ नागरिकहो, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काळजी घेणे गरजेचे आहे.

(चौकट)

साखळी कशी तुटणार?

प्रशासन म्हणतंय नियमांचं पालन करा, टायमिंगमध्ये दुकाने बंद करा; परंतु परिसरात वेगळंच चित्र पाहायला मिळतंय... नियम धाब्यावर बसवून, ‘दोनशेची आहे, पण वीस रुपये जादा द्यावे लागतील... वीस काय चाळीस जादा घे, पण दे... मागच्या दारानं ये...’ असे चित्र सध्या ग्रामीण भागात सर्रास दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. काही कर्मचारी पॉझिटिव्ह असूनही कामावर येतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी प्रशासन नक्की कशी तोडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

२२कातरखटाव

फोटो ओळ : कातरखटाव, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट करण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी दिसून येत आहे.

Web Title: Katarkhatav Primary Health Center on Saline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.