दुष्काळग्रस्तांना कासची मदत
By Admin | Updated: May 24, 2016 00:57 IST2016-05-23T21:49:04+5:302016-05-24T00:57:48+5:30
५० हजार ०१ रुपयांचा धनादेश प्रदान : चार गावांच्या वनव्यवस्थापन समितीचा पुढाकार

दुष्काळग्रस्तांना कासची मदत
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता व जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठार संयुक्त वनव्यवस्थापन समिती कास, एकीव, आटाळी, कासाणी यांच्यातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून रुपये ५० हजार एक रुपयांचा धनादेश मंत्रालयातील सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. विविधरंगी व दुर्मीळ फुलांचा नैसर्गिक वारसा जपणाऱ्या या कास पठाराची ओळख असण्याबरोबरच येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून माणुसकीचा वारसा जपल्याचे दर्शन घडले.
माण, खटाव तालुक्यात दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात पश्चिम घाटाने चारा देऊन दुष्काळी भागातील जनावरांना दिला होता. त्यानंतर आता दुष्काळग्रस्तांसाठी ५० हजार ०१ रुपयांची मदत केली. त्यामुळे त्याची आठवण करुन दिली होती.
येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश मंत्रालयातील सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यासंदर्भात मार्गदर्शन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्याकडून मिळाल्याचे संयुक्त वनव्यवस्थापन समिती कासचे अध्यक्ष विष्णू कीर्दत यांनी सांगितले. दरम्यान, कास पठार विकासासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी विष्णू कीर्दत, रामचंद्र उंबरकर, संतोष शिंदे, अशोक कुरळे, लक्ष्मण कीर्दत, संदीप कीर्दत, हणमंत गोरे, वनविभाग अधिकारी महादेव मोहिते तसेच वनसमिती पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
कासला हवीय मोबाईल सुविधा...
विविधरंगी फुलांची पर्वर्णी पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. मोबाईल रेंजअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. फुलांच्या हंगामावेळी पर्यटनाचा आस्वाद घेतल्यानंतर संबंधित वाहनचालकाला फोनद्वारे संपर्क करून पार्किंगमधून वाहन नियोजित वेळेत काढले असता वाहतूक विस्कळीत होण्याची समस्या उद्भवणार नाही. यामुळे या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी वनव्यवस्थापन समितीकडून जागा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी संबंधित विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विष्णू कीर्दत यांनी केली आहे.
या अगोदर चार-पाच वर्षांपूर्र्वी सातारा शहराच्या पूर्वेस जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासत असताना खटाव, माणमध्ये कास पठार संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत चाऱ्याचे ट्रक पुरविण्यात आले होते.