महाबळेश्वरमध्ये काश्मीरचा केशर फुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:10+5:302021-02-06T05:14:10+5:30

पाचगणी : स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेशर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड ...

Kashmir saffron will bloom in Mahabaleshwar | महाबळेश्वरमध्ये काश्मीरचा केशर फुलणार

महाबळेश्वरमध्ये काश्मीरचा केशर फुलणार

पाचगणी : स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेशर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड यशस्वी झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता केशरच्या रूपाने नव्या पिकाचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने भविष्यात येथील शेतकरी या नव्या प्रयोगाकडे वळल्यास नवल वाटू नये, यानिमित्ताने केशर हा पर्याय मात्र निश्चित उपलब्ध झाला असल्याने महाबळेश्वर तालुका आता स्ट्राॅबेरीबरोबरच केशर उत्पादक तालुका म्हणून नव्याने उदयास येणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांनी कृषी विभाग महाबळेश्वर यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर काश्मीर येथील केशर लागवड केली होती. महाबळेश्वर तालुक्यातील थंड वातावरण पोषक असल्याने लागवडीचा प्रयोग घेण्यात आला होता. या वर्षी वातावरणातील बदलाने हा प्रयोग यशस्वी होईल का, याची धास्ती लागली होती. परंतु येथील थंड वातावरण असल्याने मागील सहा महिन्यांत या लागवड केलेल्या कंदाची योग्य ती निगा राखून जोपासना केल्याने त्या प्रयोगाला यश आले आहे. या लागवड केलेल्या रोपांना आता फुले आली आहेत, तीच फुले परिपक्व होऊन त्यातूनच केशरचे उत्पादन मार्च महिन्यात होणार आहे. आता त्याचा पहिला टप्पा या रूपाने पूर्ण झाला आहे. म्हणूनच येथील शेतकऱ्याला नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

तर आता भारतात काश्मीरनंतर केशर महाबळेश्वर तालुक्यात घेतले जाईल व येथील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या स्ट्रॉबेरीला पर्यायी पीक ठरणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या कोमपूर व किस्त्वाड गावात केशरची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तेथूनच महाबळेश्वरच्या कृषी विभागाने लागवडीकरिता ४५० कंद प्रति ५० दराने उपलब्ध केले होते. काश्मिरी केशर जगभरात प्रसिद्ध आहे. केशरची बाजार किंमत साडेतीन लाख रुपये किलो आहे. साधारणत: एक ते दीड लाख फुलाच्या परागकणामधून एक ते दीड किलो केशर निघते.

महाबळेश्वर तालुक्याचे वातावरण काश्मीरच्या वातावरणाशी मिळतेजुळते असल्याने महाबळेश्वर तालुक्यात हा प्रयोग राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याकरिता काही शेतकऱ्यांची शेती या लागवडीकरिता घेण्यात आली, त्या शेतीमध्ये एक फुटाच्या अंतराने या केशरच्या कंदाची लागवड सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. यास डिसेंबर-जानेवारी दरम्यान फुले येतात. आता ही फुले आल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथील वातावरण केशर लागवडीस पोषक ठरत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरीबरोबरच केशर कॉरिडोअर झाल्याचे पाहावयास मिळणार आहे.

कोट..

क्षेत्र महाबळेश्वर येथे लागवड केलेल्या काही केशर कंदास फुले आल्यामुळे महाबळेश्वरमधील वातावरणामध्ये केशर लागवड यशस्वी होईल, असा विश्वास आहे.

- दीपक बोर्डे, कृषी सहायक, महाबळेश्वर

०५महाबळेश्वर

मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथे लागवड केलेल्या केशर कंद लागवडीस फुले आल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

Web Title: Kashmir saffron will bloom in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.