काशिनाथाच्या नावानं चांगभलं!
By Admin | Updated: March 12, 2015 00:03 IST2015-03-11T22:53:52+5:302015-03-12T00:03:57+5:30
बावधनमध्ये उत्साह : बगाड यात्रेस भाविकांची अलोट गर्दी

काशिनाथाच्या नावानं चांगभलं!
बावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधनची बगाड यात्रा ग्रामस्थांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. बुधवारी (दि. ११) पहाटे छबिना संपल्यानंतर बगाडाचा गाडा सोनेश्वर येथे नेण्यात आला. सकाळी बगाड्या बाळासो बाबूराव गायकवाड यांना विधिवत स्नान घालून, सोनेश्वर व कृष्णामाईची ओटी भरून विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी दहाच्या दरम्यान बगाड्याचा बगाडाला टांगण्यात आले. यानंतर पाच ते आठ बैल जोड्यांच्या साह्याने बगाड रथ सोनेश्वर येथून बावधन भैरवनाथ मंदिरापर्यंत ओढत आणण्यात आला.ग्रामस्थ व भाविकांच्या गर्दीने सोनेश्वर ते बावधन या रथमार्गावर राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थ मंडळ बावधन यांनी बगाड शिस्तीने व नियोजन बद्ध पद्धतीने गावात पोहचण्याकरिता ट्रॉलीतून लाउडस्पीकरद्वारे सूचना केल्या. या नियोजनामुळे भाविकांना बगाडाचे दर्शन घेता आले.
यात्रामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. (वार्ताहर)