कासचा साठा आठ फुटांवर

By Admin | Updated: May 10, 2017 22:50 IST2017-05-10T22:50:14+5:302017-05-10T22:50:14+5:30

कासचा साठा आठ फुटांवर

The Kasa reserves at eight feet | कासचा साठा आठ फुटांवर

कासचा साठा आठ फुटांवर


लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. सद्य:स्थितीत तलावात केवळ आठ फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, येत्या तीन-चार दिवसांत तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात तलाव परिसरात वळवाच्या पावसाने दोनदा हजेरी लावली. मात्र, तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा एका फुटाने कमी आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.
कास तलावाचा पाणीसाठा एकूण २४ फुटांपर्यंत असतो. २००३ मध्ये उन्हाळ्यात तलावातील पाणी अगदी पाच फुटांपर्यंत आले होते. तेव्हा सर्वात खाली असणाऱ्या तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे देखील तेव्हा पाणीपुरवठा होत नव्हता. ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तलावावर इंजिन बसवून पाणी पाटात सोडून पाणीपुरवठा केला जात होता. तशीच परिस्थिती यंदा उद्भवू शकते.
सध्या तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र इंजिनद्वारे उपसा करून पाटात सोडले जात आहे. तलावातील पातळी खालावत चालल्याने तलाव कधी बेटाचे तर कधी स्वीमिंग टँकचे रूप घेऊ लागला आहे. यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक झाले आहे.
शहराला तीन व्हॉल्व्हमधून पुरवठा
शहराला कास तलावातील एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह गेल्या काही महिन्यांपूर्वीच उघडा पडला आहे. पाणी पुरवठ्याचा दुसरा व्हॉल्व्हही आता उघडा पडत चालला आहे.
... तर इंजिन बसवून करावा लागणार उपसा
शहराला पाणीपुरवठा करताना दररोज एका इंचाने तलावातील पाणी पातळी कमी होत आहे. तीन-चार दिवसांत दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने सर्वात खाली असलेल्या व शेवटच्या तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मान्सूनचे वेळेवर हजेरी न लावल्यास तलावावर इंजिन बसवून पाणी उपसा करून पाणी पाटात सोडावे लागणार आहे.

Web Title: The Kasa reserves at eight feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.