‘कास’ तलावाला आलं बेटाचं स्वरूप!
By Admin | Updated: May 22, 2015 00:21 IST2015-05-21T22:02:08+5:302015-05-22T00:21:23+5:30
पाणीपातळी झपाट्याने खालावली : तलावात उरला आठ फूट पाणीसाठा

‘कास’ तलावाला आलं बेटाचं स्वरूप!
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणीपातळी कमी झाली असून, काही ठिकाणी उघड्या पडलेल्या जमिनीमुळे कास तलावाला ‘बेटा’चे स्वरूप आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या एक फूट जास्त पाणीसाठा असला तरी तलावात सध्या आठ फूट आठ इंच इतका पाणीसाठा शिल्लक आहे.शहाराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी एक व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला असून, दुसरा व्हॉल्व्हदेखील काही दिवसांत उघडा पडणार आहे. तिसऱ्या व्हॉल्व्हसाठी बसवण्यात आलेली संरक्षक जाळी सध्या दिसत असून, तलावात एकूण सध्या ८ फूट ८ इंच इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत जरी तलावात एक फुटाने पाणीसाठा जास्त असला तरी पूर्णपणे वरुणराजावर विसंबून राहावे लागणार आहे. वेळेत पाऊस पडला नाहीतर सातारकरांना तहान भागवणे जिकिरीचे बनणार आहे.
तलावातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने ठिकठिकाणी जमिनी उघड्या पडून बेटाचे स्वरूप येऊ लागले आहे. चोहोबाजूला पाणी असणाऱ्या या बेटावर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. परंतु घसरटी माती व अरुंद जमीन पाहता हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण वर्गासाठी धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही कित्येक पर्यटक या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून ‘फोटोसेशन’ करताना दिसत आहे. चार फूट पाणी शिल्लक राहिल्यानंतर व्हॉल्व्हमधून पाणी येत नाही. तेव्हा इंजिनद्वारे पाणी उपसून कॅनॉलमधून सोडले जाते. त्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. (वार्ताहर)
सध्या तलावातील पाणीसाठा पाहता एक ते दीड महिना पाणी पुरू शकेल. तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
- बापू किर्दत,
पाटकरी कास तलाव
पर्यटकांसाठी हे बेट म्हणजे पर्वणीच या ठिकाणी जाऊन आनंद घ्यावा; परंतु अतिउत्साही हुल्लडबाजी करणाऱ्यांवर निर्बंध घालावेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने उपाययोजना करावी.
- सुभाष जाधव,
पर्यटक, सातारा