वाठार स्टेशनमध्ये कर्नाटक पोलिसांचा गोळीबार !
By Admin | Updated: May 25, 2016 23:30 IST2016-05-25T22:50:37+5:302016-05-25T23:30:21+5:30
मंगळवेढ्यापासून खंडाळ्यापर्यंत थरारक पाठलाग : दोन आरोपी ताब्यात; मात्र स्थानिक पोलिस अनभिज्ञ

वाठार स्टेशनमध्ये कर्नाटक पोलिसांचा गोळीबार !
वाठार स्टेशन : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटकच्या पोलिसांनी वाठार स्टेशनपर्यंत त्यांचा थरारक पाठलाग केला. त्यावेळी वाग्देव चौकातून पळून चाललेल्या आरोपींना अडविण्यासाठी या पोलिसांनी गोळीबारही केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील वाग्देव चौकात नेहमीप्रमाणे शांतता होती. सकाळी साडेआठच्या सुमारास या चौकात एका ट्रीपल सीट दुचाकीला मागून भरवेगात आलेल्या कारमधील तीन-चार लोकांनी अडविले. तेव्हा दुचाकीवरील तिघेही सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. एकाला त्यांनी पकडलेही. त्यामुळे चौकात गर्दी जमू लागली; मात्र ‘गोळीबार कोणी केला, या कारमधील लोक कोण आणि दुचाकी टाकून पळून जाणारे कोण?’ या प्रश्नांभोवती चर्चा रंगली.
‘अखेर कारमधील लोक कर्नाटकमधील कोप्पळ जिल्ह्यातील पोलिस असून, त्यांना एका गुन्ह्याखाली मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन आरोपी पकडायचे होते. त्यासाठी फलटणपासून दुचाकीवरील आरोपींचा पाठलाग कर्नाटक पोलिस करत होते,’ अशी माहिती येथील स्थानिकांना मिळाली. असे असले तरी कर्नाटक पोलिसांचे हे थरारनाट्य वाठार पोलिसांनाच माहीत नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेपुढेही अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)
दुसऱ्याला खंडाळ्यातून उचलले!
तीन आरोपींपैकी एकाला वाठार स्टेशनमध्ये पकडण्यात यश आले. मात्र, दोघेजण पसार झाले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी पहिल्या आरोपीला ताब्यात घेऊन खंडाळ्याकडे प्रस्थान केले. त्याठिकाणीही त्यांना आणखी एकजण मिळून आला. या दोघांना घेऊन कर्नाटक पोलिस तपासासाठी पंढरपूरकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी सकाळी साठेआठच्या सुमारास वाठार स्टेशन येथे घडलेल्या घटनेबाबत संबंधित कर्नाटक पोलिसांनी आम्हास कोणतीही मदत मागितली नव्हती. पकडलेला आरोपी मंगळवेढा तालुक्यातील असल्याने त्या पोलिस ठाण्यात त्यांनी पत्रव्यवहार केला होता. याबाबत आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही.
- शहाजी निकम, सहायक पोलिस निरीक्षक,
वाठार पोलिस स्टेशन