कर्मवीर पथावर, वटवृक्षाखाली क्रोधनाट्य
By Admin | Updated: November 12, 2014 22:56 IST2014-11-12T21:49:48+5:302014-11-12T22:56:45+5:30
उदयनराजेंचे उपोषण : समर्थकांचा जोश, पोलिसांची धावपळ आणि कावरेबावरे सातारकर

कर्मवीर पथावर, वटवृक्षाखाली क्रोधनाट्य
सातारा : संयमाचा महामेरू मानले गेलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव दिलेल्या रस्त्याने, वटवृक्षाच्या छायेतच बुधवारी क्रोधनाट्य अनुभवले. थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान देणारे खासदार उदयनराजे, प्रचंड घोषणा देणारे त्यांचे समर्थक, धावपळ करणारे पोलीस कर्मचारी, ठप्प झालेली वाहतूक आणि या साऱ्यातून सातारच्या गुंडगिरीवर तोडगा निघणार का, असा प्रश्न चेहऱ्यावर घेऊन हे सगळे पाहणारे कावरेबावरे सातारकर, असे चित्र पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर होते.
सकाळी साडेदहापासूनच खासदार उदयनराजेंचे समर्थक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येण्यास प्रारंभ झाला. यात उपनगराध्यक्षा दिनाज सय्यद आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश होता. सव्वाअकरा वाजता उदयनराजे उपोषणस्थळी येताच समर्थकांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. ‘एक नेता, एक आवाज... उदयनमहाराज, उदयनमहाराज,’ ‘उदयनराजे अंगार है, बाकी सब भंगार है,’ ‘उदयनराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा समर्थक देत होते.
दरम्यान, याच वेळी एकेरी वाहतूक सुरू होती. मोती चौकातून पोवई नाक्याकडे येणारी वाहने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अलीकडे अडविण्यात आली. तेथून पोलीस करमणूक केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याने ती राजपथाकडे वळविण्यात आली.
उदयनराजे उपोषणस्थळी स्थानापन्न होताच समर्थकांनीही तेथेच ठाण मांडले. सुमारे शंभर जणांनी उपोषण सुरु केले. वटवृक्षाच्या सावलीत कार्पेट अंथरले होते. त्यावर उपोषणकर्ते बसले होते. त्यांच्या भोवताली सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. वटवृक्षाच्या पारावर आणि आजूबाजूच्या कुंपणभिंतींवर उभे राहून नागरिक उदयनराजेंना समर्थन देत होते. काही जण तर झाडावर चढून पाहत होते.
सुमारे वीस मिनिटांनी पोलीस अधीक्षकांनी उदयनराजेंची उपोषणस्थळी येऊन भेट घेण्यास नकार दिला आणि संतापाने उदयनराजे तेथून निघून गेले. यावेळी ते त्यांच्या मोटारीतून न जाता, त्यांच्या कार्यकर्त्याने आणलेल्या मारुती व्हॅनमधून गेले.
उदयनराजे नेमके कोठे गेले, याचा अंदाज पोलीस, नागरिक आणि पत्रकारांनाही लागेना. त्यामुळे मारुती व्हॅनच्या मागून अनेकांनी दुचाकीवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची एक व्हॅनही शोधार्थ निघाली. शासकीय विश्रामगृहावर धडक मारून काही जण सातारा क्लबच्या इमारतीत गेले. तेथे उदयनराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बोलत उभे होते. काही वेळाने तेथूनही ते कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. नंतर ते कोणालाच दिसले नाहीत.
उदयनराजे पुन्हा उपोषणस्थळी येतील अशा आशेने काही कार्यकर्ते अधीक्षक कार्यालयासमोरच घुटमळत होते. ऊन वाढू लागल्यावर एकेक कार्यकर्ता तेथून निघून गेला.
दरम्यान, उदयनराजे जे निवेदन देण्यासाठी आले होते, ते त्यांच्या समर्थकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले. साडेबारापर्यंत सर्वच कार्यकर्ते तेथून गेलेले होते. पाऊणला उपोषणस्थळी अंथरलेले कार्पेट गुंडाळण्यात आले आणि सारे काही शांत-शांत झाले. (प्रतिनिधी)
नगरविकास आघाडीची पाठ
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीच्या मनोमिलनाची सत्ता आहे. शहरातील गुंडगिरीविरोधात उदयनराजेंप्रमाणेच शिवेंद्रसिंहराजेंनीही आवाज उठविला होता. तथापि, विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही आघाड्यांमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे वातावरण आहे. त्यातच उदयनराजेंनी मंगळवारी पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंना पराभवाची मीमांसा करण्याचा सल्ला दिला होता.
या पार्श्वभूमीवर, नगरविकास आघाडीचे नगरसेवक अपेक्षेप्रमाणेच उपोषणस्थळी फिरकले नाहीत. नगराध्यक्ष सचिन सारस यांना यासंदर्भात विचारले असता, ‘मी बाहेरगावी गेलो होतो,’ असे उत्तर त्यांनी दिले.
पोलिसांची होणार पंचाईत
खासदार उदयनराजेंनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे दिल्या आहेत. यात दमदाटी, खंडणी, शिवीगाळ, मारामारी अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु या प्रत्येक अर्जाची शहानिशा करून अर्जात नमूद केलेली तक्रार खरोखरच दखलपात्र आहे का, हे पोलिसांकडून पाहिले जाईल. किरकोळ दमदाटी, शिवीगाळ असेल तर पोलिसांना अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यावाचून पर्याय राहणार नाही. दरम्यान, ‘कुणी का रे म्हटलं तरी तक्रार द्या,’ असे विधान खुद्द अधीक्षकांनीच केल्यामुळे पोलिसांची दुहेरी कोंडी होणार आहे. परिणामी अशा गुंडांवर पोलिसांना कायद्याच्या चौकटीत कारवाई करता न आल्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये रोष वाढण्याची शक्यता आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
उदयनराजेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. एवढेच नव्हे तर ‘मेटल डिटेक्टर’ही मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रथमच पाहायला मिळाला. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी लाठीधारी पोलीस उभे होते. मुख्यालयात कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. शिवाय वाहतूक वळविल्याने अनेक पोलीस कर्मचारी त्या कामात गुंतले होते.
एसपींनी सर्वांनाच नाकारली भेट
पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज, तक्रारी देण्यासाठी अनेकजण दररोज येतात. बुधवारीही अनेकजण भेटण्याच्या वेळेत तेथे उपस्थित होते. तथापि, एसपी आज कोणालाच भेटणार नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे ताटकळत बसलेल्या तक्रारदारांची निराशा झाली.
‘त्या’ यादीतील गुंड कोण-कोण?
उदयनराजेंनी पोलिसांना १५ हून अधिक तक्रारी सादर केल्या आहेत. त्यात शहरातील अनेक गुंडांच्या नावांचा समावेश आहे. त्या यादीत कोणाकोणाची नावे आहेत, हे पोलिसांनी अतिशय गोपनीय ठेवले आहे. प्रसारमाध्यमांनाही या नावांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या यादीतील गुंड कोण, याविषयी सातारकरांमध्ये
उत्सुकता आहे.
खासदार उदयनराजे यांच्यासमवेत उपनगराध्यक्षा दिनाज शेख, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, साविआचे नगरसेवक, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.
उदयनराजेंचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपोषणस्थळी येण्यास पोलीस अधीक्षकांनी नकार दिल्याने उदयनराजे त्वेषाने उठले आणि थेट पोलीस यंत्रणेला त्यांनी इशारे दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी परिसरात प्रचंड गर्दी जमली होती.