कऱ्हाडला वडापचा ‘हम करे सो कायदा’
By Admin | Updated: May 14, 2015 00:32 IST2015-05-13T21:53:57+5:302015-05-14T00:32:04+5:30
चौकाचौकात बेशिस्त पार्कींग : कोल्हापूर नाक्यावर होतोय साक्षात्कार; प्रवाशांची मात्र होतेय तारांबळ

कऱ्हाडला वडापचा ‘हम करे सो कायदा’
कऱ्हाड : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर नाक्यावर वारंवार बेशिस्त वाहतुकीचा नेहमीच अनुभव येतो. या ठिकाणी वडाप तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या मनमानीविरुद्ध पोलिसांकडून अनेकवेळा कारवाई होऊन देखील त्यांच्याकडून या कारवाईस वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात. त्यामुळेच कोल्हापूर नाक्यावर पुन्हा एकदा ‘हम करे सो कायदा,’ याचा साक्षात्कार प्रवाशांना होत आहे.कोल्हापूर नाक्यावर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत वडाप, ट्रॅव्हल्स तसेच खासगी वाहनचालकांची मनमानी पाहावयास मिळते. यापूर्वी कऱ्हाड पोलिसांनी अनेकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने खासगी तसेच वडाप वाहनचालकांची मनमानी वाढली आहे. पुणे बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणाऱ्या उपमार्ग रस्त्यावरील नो-पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन खासगीवाहन चालकांकडून राजरोसपणे केले जात आहे.
कोल्हापूर नाक्यावर असलेल्या एचडीएफसी बँक परिसरात शहर पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी बॅरिगेटिंग करून एसटीसाठी स्वतंत्र थांब्याची व्यवस्थाही केली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत झाली होती. मात्र, या ठिकाणी आता वडाप तसेच खासगी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर बदलेली वाहतूक व्यवस्था पुन्हा जैसे थे, अशी झाली आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले बॅरिगेटसही गायब झाले असून, वडाप विशेषत: अॅपेरिक्षा मनमानी पद्धतीने उभ्या जात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत तसेच सायंकाळी पाच वाजल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच फळविक्रीचे हातगाडे, कोल्हापूर दिशेकडे जाणारे प्रवासी रस्त्यावरच उभे असतात. त्यांच्याकडूनही नियमांचे उल्लंघन होत असून, त्यामुळे अनेकवेळा अपघाताचे प्रकारही घडले आहेत.
या ठिकाणाहून वीस ते पंचवीस फुटांवर महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली शहर पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे असतात. त्यांच्याकडून या ठिकाणी कासवाच्या गतीप्रमाणे कारवाई केली जातेय. रात्रीचा प्रवास करून येणाऱ्या ट्रॅव्हल्स, मालट्रकही उपमार्गावर दिवसभर उभे असतात. महामार्गालगतचा उपमार्गावर असलेला रस्ता त्यामुळेच वडाप, ट्रॅव्हल्सचा पर्किंगचा अड्डा बनला आहे. याठिकाणी होत असलेल्या अपघाताबाबत तसेच वाहतूक कोंडीबाबत अनेकवेळा नागरिक, स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांना निवेदनेही दिली
आहेत.
मात्र, याविषयी त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगितले जात असले तरी कऱ्हाडात मात्र वडापवाल्यांकडून ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार केला जात आहे. तर त्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. (प्रतिनिधी)
उड्डाण पुलाखालीच गप्पा
कोल्हापूर नाका परिसरात पुणे- बेंगलोर या महामार्गाच्या रस्त्याचा उड्डाणपूल आहे. या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलाखालीच एका बाजूला वडापचालक गप्पा मारत बसलेले असतात. त्यांच्या समोरच वाहतूक पोलीस कर्मचारी उभे असतात. मात्र, त्यांच्याकडून काहीच केले जात नाही.
म्हणे, आम्ही नियमांचे पालन करतोय
वडापवाल्यांकडून मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पार्किंगचा त्रास अनेकवेळा प्रवाशांना सहन करावा लागतो. त्याबाबत प्रवाशांकडून अनेकवेळा वडापवाल्यांना वाहतूक कोंडीबाबत सूचनाही दिल्या जातात. त्यावेळी आम्हाला पार्किंगचे तसेच वाहतुकीचे नियम माहीत असून, त्याचे आम्ही पालन करतो, असे वडापवाल्यांकडून प्रवाशांना सांगितले जाते.