कऱ्हाडची वाहतूक शाखा ‘राम’भरोसे!
By Admin | Updated: November 7, 2014 00:09 IST2014-11-06T20:36:14+5:302014-11-07T00:09:37+5:30
शाखेला ‘कुरण’ बनवलंय. या कुरणात फौजदाराऐवजी सध्या कर्मचारीच चरत असल्याचे चित्र

कऱ्हाडची वाहतूक शाखा ‘राम’भरोसे!
संजय पाटील - कऱ्हाड -वर्दीतल्या काहीना ‘साहेब’ व्हायची भारी हौस असते. चारचौघांत आवाज वाढवायचा, कॉलर ‘टाईट’ करायची आणि शिपाई असूनही फौजदाराचा रुबाब झाडायचा. शहर पोलीस ठाण्यातल्या वाहतूक शाखेतही सध्या अशा स्वयंघोषित साहेबांचा सुकाळ आहे. काहीचा वर्षापासून तर काहीचा अनेक महिन्यांपासून एकाच ठिकाणी ठिय्या असल्यामुळे त्यांनी वाहतूक शाखेला ‘कुरण’ बनवलंय. या कुरणात फौजदाराऐवजी सध्या कर्मचारीच चरत असल्याचे चित्र आहे.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संभाजी पाटील व उपअधीक्षकपदी विजय दळवी कार्यरत असताना वाहतूक शाखा चांगलीच वादात सापडली होती. शाखा ढेपाळल्यामुळे व कर्मचाऱ्यांची ‘फौजदारकी’ वाढल्यामुळे त्यावेळी उपअधीक्षक दळवी यांनी ही शाखा उपविभागीय कार्यालयाशी जोडली. स्वत: उपअधीक्षक दळवी यांनी काहीकाळ वाहतूक शाखा सांभाळली. कर्मचाऱ्यांना सूतासारखे सरळ केले आणि त्यानंतर पुन्हा ही शाखा शहर पोलीस ठाण्याशी जोडण्यात आली. सध्याही वाहतूक कर्मचाऱ्यांकडून त्यावेळचाच कित्ता गिरवला जातोय. ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती बळावल्याने शाखेचा कारभार ‘राम’भरोसे झालाय. मुळात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा दबाव असणे गरजेचे असते. मात्र, शहर पोलीस ठाण्यात नेमके याच्या उलट चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांची ‘पाटीलकी’ एवढी वाढलीय की, ते फौजदारालाही जुमानत नाहीत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल एवढे कर्मचारी सध्या या शाखेत कार्यरत आहेत. मात्र, वाहतूक सांभाळण्याऐवजी स्वत:चे खिसे गरम करण्यातच काही कर्मचारी व्यस्त आहेत.
काहीना वाहतुकीऐवजी पावत्या बनविण्याचा ‘घोर’ ‘पड’लाय. तर काहीजण शहर सोडून चक्क महामार्गावर आपलं वसुलीचं ‘घोडं’ दामटतायत. काही महिन्यांपूर्वी शाखेतला एकजण ‘खाकी’ऐवजी ‘खादी’ घालून ‘पाटण’च्या मार्गावर चकरा मारताना दिसायचा. सध्या तो गायब झाला असला तरी वडापवाल्यांमागची साडेसाती ‘मुळी’च संपलेली नाही. ‘साठे’लोटे असतानाही त्यांना पोलिसांच्या नावाखाली अन्य काहीजणांना खूष करावंच लागतंय.
पावत्यांचा ‘घोर’ ‘पड’लेले, वसुलीचं ‘घोडं’ दामटणारे, ‘खादी’ घालून ‘पाटण’च्या मार्गावर चकरा मारणारे, वडापवाल्यांना ‘मुळी’च न सोडणारे आणि ‘साठे’लोटे असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या ही शाखा बदनाम होतेय.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘राम’भरोसे सुरू असणाऱ्या या शाखेच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
वाहतूक बिघडली, शाखाही विस्कटली
कऱ्हाडातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल ही गर्दीची आणि रहदारीची ठिकाणे आहेत. या मार्गांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते; पण सिग्नलचे पॉइंट वगळता इतर महत्त्वाच्या ठिकाणी अपवाद वगळता कधीही वाहतूक कर्मचारी दृष्टीस पडत नाही. या शाखेची जबाबदारी आत्तापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी पेलली आहे. त्यामध्ये तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हरीष खेडकर, सुनील दोरगे, यशवंत ढगे, शिवाजी कदम, धनंजय पिंगळे, प्रदीप शिंदे, विद्या जाधव यांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही त्या-त्यावेळी शिस्तीचे ‘डोस’ दिले होते. सध्या मात्र वाहतुकीबरोबरच कर्मचाऱ्यांवरही अंकुश ठेवण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे.