कऱ्हाडच्या आरटीओमध्ये ‘बुडबुड घागरी’चा ‘ड्रामा’!
By Admin | Updated: June 17, 2016 23:54 IST2016-06-17T21:44:16+5:302016-06-17T23:54:58+5:30
वाहनांचे ‘पार्ट’ जातायत चोरीला : सुरक्षारक्षक म्हणे... टायर चोरीला गेले तरी ‘देणंघेणं’ नाही; आता ‘खीर’ कोण खातंय कळणार कसं?

कऱ्हाडच्या आरटीओमध्ये ‘बुडबुड घागरी’चा ‘ड्रामा’!
कऱ्हाड : ‘बुडबुड घागरी’ची चित्रकथा प्रत्येकाने वाचली असेल. आता याच चित्रकथेशी मिळताजुळता ‘ड्रामा’ कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळतोय. ‘परिवहन’ने कारवाई करून ताब्यात घेतलेल्या वाहनांचं साहित्य चोरीला जातंय. मात्र, या चोरीची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. ‘खीर’ कोणी खाल्ली, हे कोणालाच माहिती नाही. एवढच नव्हे तर येथील सुरक्षारक्षक ‘देणंघेणं’च नाही, असं सागून हात काढून घेतायत. त्यामुळे वाहनधारक चांगलेच धायकुतीला आलेत. अनेकजण कष्टातून वाहने खरेदी करतात. त्या वाहनाची देखभालही करतात. मात्र, अपुरी किंवा चुकीची कागदपत्र आढळल्यास संबंधित वाहनावर कारवाई होते. कधीकधी जागीच दंड करून वाहने सोडली जातात. मात्र, अनेकवेळा संबंधित वाहन पोलिस किंवा परिवहन कार्यालय ताब्यात घेते. जोपर्यंत कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत संबंधित वाहन त्या-त्या कार्यालयाच्या आवारातच अटकावून ठेवण्यात येते. कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अशाच पद्धतीने अनेक वाहने दररोज अटकावून ठेवली जातात. अवैध प्रवासी वाहतूक, अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणास्तव ही कारवाई होते. ताब्यात घेतलेली वाहने परिवहन कार्यालयाच्या परिसरातच लावण्यात येतात. वाहन मालकाला दंडाची रक्कम भरण्यास किंवा मुळ कागदपत्र सादर करण्यासही सांगितले जाते. मात्र, वाहन कार्यालयाच्या परिसरात असले तरी ते सुरक्षित नाही, हे अद्याप अनेक वाहनधारकांना माहिती नाही. ताब्यात घेतलेले वाहन परत मिळेपर्यंत त्या वाहनाच्या देखभालीची जबाबदारी परिवहन कार्यालयाचीच असते, असा अनेक वाहनधारकांचा समज आहे. मात्र, आता हा समज खोटा ठरलाय. परिवहन कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाहनांचे साहित्य चोरीला जात आहे. वाहनधारक दंडाच्या पैशाची तजविज करून व कागदपत्र जमवून कार्यालयात गेल्यानंतर सर्व सोपस्कार पार पाडून त्याला वाहनाची चावी दिली जाते. वाहनधारक आपल्या वाहनानजीक गेल्यानंतर एखादा पार्ट चोरीस गेल्याचे त्याच्या निदर्शनास येते. मात्र, याबाबत दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण होतोय. चोरीच्या प्रकाराबाबत वाहनधारकाने सुरक्षारक्षकांकडे चौकशी केल्यास ते जबाबदारी झटकतात. ‘आमच्याकडे कार्यालयाच्या सुरक्षेचे काम आहे. तुमच्या वाहनाचे टायर चोरीला गेले तरी आम्हाला काही देणंघेणं नाही,’ अशी उत्तरे सुरक्षारक्षकांकडून दिली जातात. त्यामुळे वाहनधारकाला झालेले नुकसान ‘अक्कलखाती’ जमा करून तेथून निघावे लागते. परिवहन कार्यालयातील हा प्रकार वाहनधारकांची सध्या डोकेदुखी ठरतोय. चोरी कोणं करतंय, हे सुरक्षारक्षकांना माहिती नाही. एवढच नव्हे तर हे आमचं कामचं नाही, असचं ते सांगतायत. त्यामुळे भरवसा कुणावर ठेवावा, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी) परिवहन, पोलिस किंवा अन्य कोणत्याही विभागाने कारवाई करून वाहन ताब्यात घेतल्यास त्या वाहनाची देखरेख करण्याचे काम संबंधित विभागाचे नाही. परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आलेली वाहने कार्यालयाच्या आवारात लावण्यात येतात. मात्र, त्या वाहनांची जबाबदारी वाहन मालकाचीच असते. - स्टिव्हन अल्वारीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आधी दंड, मग भुर्दंड! वाहनांची कागदपत्र अपुरी असणे किंवा वाहन सुस्थितीत नसणे, या बाबी गंभीर आहेत. अशा वाहनांवर संबंधित विभागामार्फत कारवाई व्हायलाच हवी. मात्र, कारवाई झालेल्या वाहन मालकाने हजारोचा दंड भरल्यानंतर चोरीस गेलेल्या ‘पार्ट’चा हजारोचा भुर्दंड सोसायचा, हा प्रकार ‘भिक नको; पण कुत्रं आवर’ म्हणण्यासारखाच आहे. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.