कऱ्हाडात ठेकेदाराकडूनच वृक्षांवर कुऱ्हाड !

By Admin | Updated: August 8, 2016 23:40 IST2016-08-08T22:44:45+5:302016-08-08T23:40:12+5:30

पर्यावरणप्रेमींची आक्रमक भूमिका : गटर बांधकामासाठी एकोणतीस वृक्ष तोडले; मुख्याधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस

Karhad's contractor has axed trees! | कऱ्हाडात ठेकेदाराकडूनच वृक्षांवर कुऱ्हाड !

कऱ्हाडात ठेकेदाराकडूनच वृक्षांवर कुऱ्हाड !

कऱ्हाड : येथील दत्तचौक ते कृष्णा नाका मार्गावर रस्ता रूंदीकरण कामावेळी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून पालिकेची परवानगी न घेता तब्बल २९ वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने तोडले असल्याचे सोमवारी निदर्शनास आले. दरम्यान, सोमवारी, दुपारी बारा वाजता कऱ्हाड अर्बन बँक परिसरातील पाच वृक्ष ठेकेदाराने तोडल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आल्यानंतर ठेकेदारावर पालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे व पर्यावरण प्रेमी नाना खामकर यांनी मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास दोन दिवसात याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित ठेकेदाराकडून कऱ्हाड शहर पोलिस स्टेशन ते राजर्षी शाहू महाराज चौक या रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. सोमवारी ठेकेदाराने या मार्गावरील दोनशे मीटर अंतरामध्ये असलेली पिंपरणीचे पाच वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने तोडले. वृक्षतोडीसाठभ ठेकेदाराने वनविभाग तसेच पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे, पर्यावरणप्रेमी नाना खामकर, पालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे प्रमुख मिलिंद शिंदे यांनी विरोध दर्शविला. तसेच सदरचे काम थांबवले.
याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना दिल्यानंतर त्यांनी नगरअभियंता एम. एच. पाटील यांना याबाबत अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार नगरअभियंता पाटील यांनी वृक्षतोडीचा अहवाल सादर केला. त्यानंतर मुख्याधिकारी औंधकर यांनी ठेकेदारास वृक्षतोडीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरूवातीला रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. दरम्यान, या कामामध्ये १५ मीटर रस्त्याची रूंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रूंदीचा दुभाजक केला जाणार आहे. रस्ता रूंदीकरणामध्ये अडीचशे वृक्ष येत असल्याने त्यांच्यावर ेकुऱ्हाड पडणार होती. मात्र, यास वृक्षप्राधिकरण समितीच्यावतीने विरोध केला व पालिकेने वृक्षतोड न करता रस्ता करावा, अशी मागणी केली. त्याबाबत निर्णय न झाल्याने कृष्णानाका ते दत्तचौक या मार्गावर पादचारी मार्गाखालील नाला बांधकामावेळी ठेकेदाराने वृक्ष तोडले. (प्रतिनिधी)


वृक्षतोडी विरोधात असा आहे गुन्हा.......
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन १९७५’ या कायद्यांतर्गत वृक्षांसंदर्भातील तरतुदीचे उल्लंघन करून झाड तोडणे, झाड तोडण्यास कारणीभूत होणे, आदेश पालनात कसूर आणि कर्तव्य पालनात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला अपराध सिद्ध झाल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. गुन्हेगारास दिला जाणारा कारावास एक आठवड्यापेक्षा कमी आणि एक वर्षापेक्षा जास्त नसेल. त्याचबरोबर दंडाची रक्कमही प्रत्येक अपराधाकरिता एक हजार ते पाच हजार रूपयांपर्यंत असेल. याशिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत देखील आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा !

सोमवारी संबंधित ठेकेदाराकडून शाहू चौक ते कऱ्हाड शहर पोलिस स्टेशन मार्गावर २०० मीटर अंतरावर पाच वृक्ष तोडण्यात आले. त्यापूर्वी दत्तचौक ते कृष्णा नाका मार्गावरील अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. याबाबत वनविभाग अथवा पालिकेची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराने ती घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनाने वृक्ष अधिनियमचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मानद वन्यजिव रक्षक रोहन भाटे व पर्यावरणमित्र नाना खामकर यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Karhad's contractor has axed trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.