कऱ्हाडकरांनी केली लाखांत करभरपाई
By Admin | Updated: March 2, 2016 00:55 IST2016-03-01T23:13:26+5:302016-03-02T00:55:02+5:30
पालिकेत गर्दी : मंगळवारी दिवसभरात सुमारे बारा लाख रुपये वसुली

कऱ्हाडकरांनी केली लाखांत करभरपाई
कऱ्हाड : मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी थकबाकीधारकांची नावे फ्लेक्सबोर्डवर झळकविण्याचा निर्णय घेत थकबाकीधारकांच्या नावाचे बोर्डही लावले. त्यामुळे शहरातील थकबाकीधारकांकडून कराची रक्कम भरण्यास पालिकेत गर्दी केली जाऊ लागली आहे. सोमवारी दिवसभर ६५ लाखांची वसुली झाल्यानंतर मंगळवारी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी शहरातील बाजारपेठ बंद असूनही सुमारे दहा लाख रुपये पालिकेच्या करवसुली विभागात जमा झाले.
कऱ्हाड पालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेल्या थकबाकीधारकांच्यावरील कारवाईनंतर याची थकबाकीधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे आजपर्यंत वर्षभरात जमा न झालेली कराची थकबाकीची रक्कम ही एका दिवसांत जमा झाली. गेल्या वर्षी ३१ मार्च या शेवटच्या दिवशी ५४ लाख रुपये कराची रक्कम जमा झाली होती. तर यावर्षी २९ फेब्रुवारी या दिवशी ६५ लाख रुपये जमा झाले.
शहरातील घरपट्टी व पाणी पट्टीसह एकूण संकलित कर भरणाऱ्यांकडून चालू वर्षासह मागील वर्षाचीही थकबाकीची रक्कम वसूल केली जात आहे. मार्च महिना सुरू झाल्याने पहिल्या दिवशीही थकबाकीधारकांनी पालिकेत येऊन आपली थकित कराची रक्कम भरली. (प्रतिनिधी)
दरम्यान, आज मुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचालनालयात संचालिका मिता लोचन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्याला कऱ्हाडचे मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. या बैठकीत कऱ्हाड नगरपरिषदेच्या करवसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ९० टक्के थकबाकी वसुली झाल्याखेरीज वसुलीच्या प्रमाणात मिळणारे अनुदान कऱ्हाड पालिकेला मिळणार नसल्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
मंगळवार पेठेतील
फलक तयार
शहरातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पेठांपैकी मंगळवार पेठेचे नाव घेतले जाते. सध्या मंगळवार पेठेतील थकबाकीधारकांच्या यादीचे फलक तयार करण्यात आले आहे. आठ फूट रुंद व सहा फूट लांबी असलेल्या एका फ्लेक्सवर ९० ते १०० थकबाकीधारकांची नावे टाकण्यात आली आहेत. सर्व पेठांचे फलक तयार झाल्यानंतर ते एकत्रित स्वरूपात लावले जाणार आहेत.
सील केलेल्या गाळेधारकांनी भरले चार लाख रुपये
पालिकेकडून कऱ्हाड शहरातील थकित गाळेभाडेधारकांवरही कारवाई केली जात आहे. अशात काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील काही गाळे सील केले होते. त्या सीलकेलेल्या गाळेधारकांकडून पालिकेत मंगळवारी सुमारे चार लाख रुपये कराची रक्कम रोख तसेच चेकद्वारे जमा करण्यात आली.