कऱ्हाडला जनशक्ती आघाडीतील "त्रिभाजन" चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:18+5:302021-03-19T04:38:18+5:30

कऱ्हाड : येथील नगरपालिकेत बहुमत असणाऱ्या जनशक्ती आघाडीतील धुसफूस थांबता थांबेना; आगामी पालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने ...

Karhad on the stage of "Tribhajan" in Janshakti alliance! | कऱ्हाडला जनशक्ती आघाडीतील "त्रिभाजन" चव्हाट्यावर!

कऱ्हाडला जनशक्ती आघाडीतील "त्रिभाजन" चव्हाट्यावर!

कऱ्हाड : येथील नगरपालिकेत बहुमत असणाऱ्या जनशक्ती आघाडीतील धुसफूस थांबता थांबेना; आगामी पालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने ही धुसफूस वाढतच चालली आहे .गेली दोन वर्षे जनशक्ती आघाडीत विभाजन असल्याचे दिसत होते; मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले शुभेच्छा फलक पाहिल्यानंतर आघाडीत त्रिभाजन असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत जनशक्ती आघाडी काय काय राजकीय वळण घेणार याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे.

गत पालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक मातब्बर नेते जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले. ''जनशक्ती''ला स्पष्ट बहुमत मिळाले; पण थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले, तर प्रमुख उमेदवार असणाऱ्या राजेंद्र यादव यांनादेखील पराभवाचा धक्का बसला. यादव यांच्या पराभवाला स्वकीयच जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागला आणि पृथ्वीराज चव्हाण व जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांच्यात काही दिवसांतच अंतर पडत गेले. पुढे पुढे ते खूपच वाढत गेले हा सर्व घटनाक्रम कऱ्हाडकरांना माहीत आहे.

जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अरुण जाधव यांनी यात बराच मेळ घालण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र यादव यांना स्वीकृत नगरसेवक केले गेले, तर जयवंतराव पाटील यांना उपनगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली .पालिकेचा कारभार हाकताना सुरुवातीच्या काळात भाजपमधून विजयी झालेल्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व जनशक्ती आघाडीत सुसंवादही पाहायला मिळाला .

गटनेते राजेंद्र यादव यांचा सुरुवातीच्या काळात पालिकेत वावर कमीच दिसत होता. नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष कारभार करीत होते. मात्र, दोन वर्षांपासून उपनगराध्यक्ष पाटील व गटनेते यादव यांच्यात धुसफूस दिसू लागली. उपनगराध्यक्ष पाटील यांनी तर पालिकेच्या एका सभेतच माझ्यासह पाच नगरसेवकांना सभागृहात बसण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणीही केली होती. यावरून ‘जनशक्ती’त सर्व काही आलबेल नाही, आघाडीत बिघाडी झाली आहे, ती समोर आली. त्याबाबतच्या राजकीय घडामोडी कऱ्हाडकरांना पदोपदी दिसूनही आल्या आहेत.

मध्यंतरी पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेच्यावेळी सत्ताधारी भाजप व जनशक्ती आघाडीत ''तू तू -मै मै'' झाली. सभागृहात झालेला गदारोळ सर्वांना माहीत आहे. त्यानंतर दोघांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अगदी खालच्या पातळीवर जाऊन केलेली एकमेकांवरील टीका कऱ्हाडकरांनी ऐकली व वाचली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींपासून उपनगराध्यक्ष पाटील व त्यांचे समर्थक नगरसेवक अलिप्त राहिल्याने जनशक्तीचे विभाजन गडदपणे समोर आले .

नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस झाला .त्यानिमित्त कऱ्हाडात शुभेच्छांचे अनेक फलक लागले; पण त्यात जनशक्ती आघाडीने लावलेल्या शुभेच्छा फलकाची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या जनशक्तीतून गतवेळी नगरसेवक निवडून आले; पण काही दिवसांतच त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांकडे पाठ फिरवली, त्याच जनशक्ती आघाडीच्या अध्यक्षांनी इतर पदाधिकाऱ्यांच्या छबीसह लावलेला शुभेच्छांचा फलक बरंच काही सांगून जातो. यातून जनशक्तीचे केवळ विभाजन नाही, तर ते त्रिभाजन आहे हे सुज्ञ कऱ्हाडकरांनी आता ओळखले आहे. विशेष म्हणजे जनशक्तीच्या फलकावर हाताचे चिन्ह ठळकपणे दिसत आहे.

चौकट:

हे सगळे एकत्र आले तरी कसे...

--------

गत निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची निवडणूक एकत्रित लढण्याचे अनेकांनी ठरविले. त्यावेळी ही निवडणूक काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढविण्याचा काहींनी प्रस्ताव ठेवला; पण आघाडीच्या राजकारणाची सवय लागलेल्या मेहरबानांना ते पचले नाही. मग आघाडीच्या माध्यमातूनच लढायचं निश्चित झालं. यावेळी राजेंद्र यादव यांची ''यशवंत आघाडी'', अरुण जाधव यांची ''जनशक्ती आघाडी'' व जयवंतराव पाटील यांची ''लोकसेवा आघाडी'' असे तीन पर्याय समोर आले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे जनशक्ती आघाडीचा पर्याय साऱ्यांनी स्वीकारला एवढेच!

चौकट:

''जनशक्ती''ला पृथ्वीराजांची ताकद मिळणार का ?

गतवेळी जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणूक लढवली गेली; पण बहुमत प्राप्त होऊनही पृथ्वीराज चव्हाण यांचा ''हात'' रिकामाच राहिला. त्यामुळे येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत ते मूळच्या जनशक्ती आघाडीला ताकत देणार की काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर लढण्यासाठी आग्रही राहणार हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागणार आहे.

फोटो

18 राजेंद्र यादव 01

18 अरुण जाधव 02

18 जयवंत पाटील 03

Web Title: Karhad on the stage of "Tribhajan" in Janshakti alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.