कऱ्हाड पालिका राज्यात द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:48+5:302021-06-06T04:28:48+5:30
राज्यातील पालिकांसाठी सन २०२०-२१ मध्ये ‘माझी वसुंधरा’ ही भूमी, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्पर्धा घेण्यात ...

कऱ्हाड पालिका राज्यात द्वितीय
राज्यातील पालिकांसाठी सन २०२०-२१ मध्ये ‘माझी वसुंधरा’ ही भूमी, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये २२२ पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून सहा पालिकांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षीस वितरण शनिवारी करण्यात आले. कऱ्हाड पालिकेने स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी ऑनलाइन हा सन्मान स्वीकारला.
कऱ्हाडमध्ये पालिकेच्या वतीने गत वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचेच हे फलित असून माझी वसुंधरा संचालनालयाकडून पालिकेस निवडीचे पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर संचालनालयाच्या वतीने पालिकेच्या उपक्रमाची ऑनलाइन पाहणी करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ, सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत शनिवारी बक्षीस वितरण झाले.
जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह माझी वसुंधरा अभियानात योगदान देणा-या पालिका सेवकांचा यानिमित्त यथोचित सत्कार केला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, बांधकाम समितीचे सभापती हणमंत पवार, नगरसेविका विद्या पावसकर, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, जलनि:सारण अभियंता एन.आर. पवार, स्वच्छ सर्वेक्षणाचे नोडल ऑफिसर रफिक भालदार, नगरअभियंता एन.एस. पवार उपस्थित होते.
- चौकट
नगरपंचायत गटात मलकापूर तृतीय
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नगरपंचायत गटाचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये क-हाड तालुक्यातील मलकापूर पालिकेने नगरपंचायत गटात तिसरा क्रमांक पटकावला असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे मलकापुरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
- चौकट
यशाची घोडदौड कायम
१) माझी वसुंधरा द्वितीय पुरस्काराची रक्कम तीन कोटी रुपये आहे.
२) पुरस्कार जाहीर होताच आतषबाजी करीत आनंद व्यक्त करण्यात आला.
३) कऱ्हाड पालिकेने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्षे देशपातळीवरील प्रथम क्रमांक मिळवला आहे.
४) राज्य शासनाचा वसुंधरा पुरस्कारही कऱ्हाड पालिकेने यापूर्वी मिळवला आहे.
- कोट
माझी वसुंधरा अभियानातील हे यश हे सर्व नागरिकांचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच हे साध्य झाले. शहरातील विविध सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवले. स्वच्छता अभियान, वृक्षलागवडीसह विविध मोहिमेत सहभाग घेतला. यापुढे होणा-या स्पर्धेत सर्वांच्या सहकार्याने क-हाड पालिका अव्वलस्थानी राहील.
- रमाकांत डाके, मुख्याधिकारी
फोटो : ०५कऱ्हाड पालिका
कॅप्शन : कऱ्हाड पालिका