कऱ्हाड पालिका शाळा नऊला ‘आयएसओ’ मानांकन

By Admin | Updated: March 15, 2016 00:40 IST2016-03-14T21:41:30+5:302016-03-15T00:40:03+5:30

सुभाष पाटील यांची माहिती : अब्दुल कलामांच्या नावाने संगणक कक्ष, तर कुसुमाग्रजांच्या नावाने वाचनालय

Karhad Palika School Noula 'ISO' Rankings | कऱ्हाड पालिका शाळा नऊला ‘आयएसओ’ मानांकन

कऱ्हाड पालिका शाळा नऊला ‘आयएसओ’ मानांकन

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे नेहमीच लक्ष दिले आहे. म्हणूनच पालिकेच्या शाळा क्रमांक नऊचे रूपडे बदलण्यात यश आले असून, लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी आयएसओ मानांकन टिमने शाळेस भेट दिली. भौतिक सुविधा, गुणवत्ता, ई-लर्निंग आदींची पाहणी करून शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्याचे जाहीर केल्याची माहिती कऱ्हाड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व शिक्षण मंडळाचे सभापती सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्याध्यापक अरविंद पाटील उपस्थिती होते.
सुभाष पाटील म्हणाले, ‘शिक्षण मंडळाचा सभापती म्हणून या शाळेतील शिक्षकांनी आपली शाळा ‘आयएसओ’ करण्याबाबतची इच्छा बोलून दाखविली. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. लोकसहभाग वाढत गेला आणि शाळेचे रूप आज पालटून गेले आहे.’
मुख्याध्यापक अरविंद पाटील म्हणाले, ‘सुभाष पाटील यांनी स्वत: शाळेस पाच संगणक, प्रोजेक्टर, लॅपटॉप, प्रिंटर दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची संधी मिळू लागली आहे. वाचनालय, प्रयोगशाळा, इंग्रजी कक्ष, गणित कक्ष अशी निर्मिती करण्यात आली आहे. ज्ञानरचनावाद ही अद्यापन पद्धती शाळेत राबविण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासन अधिकारी सुरेश पांढरपट्टे यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले.’ (प्रतिनिधी)

कला, क्रीडा, संगीतासाठी नेमणार स्वतंत्र शिक्षक ..
प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गुणवत्तेबरोबर त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा तो विकास साधण्यासाठी कला, क्रीडा, संगीत आदी विषयांसाठी स्वतंत्रपणे तज्ज्ञ शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापनाने घेतला असल्याची माहिती सुभाष पाटील यांनी दिली.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’..
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे वॉच ठेवण्यात आला आहे. याशिवाय उपस्थितांसाठी बायोमेट्रिक सिस्टीम, आरोग्य संवर्धनासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, मनोरंजनासाठी खेळणी अन् प्रसन्न शालेय परिसर अशा सुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


सर्व स्तरातून कौतुक..
शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या मुख्याध्यापक अरविंद पाटील, शिक्षिका अर्चना मुंढेकर, अजंली कदम, ज्योती कितीपुडवे, नीलिमा पाटील, आशा कांबळे, भारती पवार, लक्ष्मी पवार यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Karhad Palika School Noula 'ISO' Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.