कऱ्हाड नगरपालिकेचा आज होणार ऑनलाइन सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:14+5:302021-06-05T04:28:14+5:30
कऱ्हाड : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऑनलाइन सन्मान सोहळा शनिवारी (दि. ५) दुपारी ...

कऱ्हाड नगरपालिकेचा आज होणार ऑनलाइन सन्मान!
कऱ्हाड : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऑनलाइन सन्मान सोहळा शनिवारी (दि. ५) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. यामध्ये कऱ्हाड नगरपालिकेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनी दिले आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत नगरपरिषदांच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये कऱ्हाड नगरपरिषदेचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियानांर्तगत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी कराड शहराने केलेल्या या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान यांचे वतीने कऱ्हाड नगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा ५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके ऑनलाइन उपस्थित राहुल सन्मान स्वीकारणार आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत अशा प्रकारचा ऑनलाइन कार्यक्रम प्रथमच संपन्न होत आहे.