कऱ्हाड : प्रीतिसंगमावर बेकायदा वाळू उपसा
By Admin | Updated: September 25, 2014 23:22 IST2014-09-25T21:26:46+5:302014-09-25T23:22:27+5:30
प्रशासन सुस्त : ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचा होतोय वापर

कऱ्हाड : प्रीतिसंगमावर बेकायदा वाळू उपसा
कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम परिसरात दिवसाढवळ्या बेकायदा वाळूउपसा होत आहे़ कृष्णा-कोयनेच्या संगमाशेजारी वाळूची चोरी होत असताना प्रशासन मात्र सुस्त असून, वाळू चोरीसाठी राजरोसपणे ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचा वापर होत असल्याचे दिसून येते़
कृष्णा-कोयनेच्या संगम परिसरात कोणत्याही प्रकारचा अधिकृत वाळू ठेका शासनाकडून देण्यात आलेला नाही़ मात्र, अनेक दिवासांपासून या परिसरात राजरोसपणे वाळूची चोरी होत आहे़ सध्या नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे वाळवंट उघडे झाले आहे़ यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला लागून असलेल्या वाळवंटात त्याचठिकाणी वाळू चाळून बैलगाड्या व ट्रॅक्टरच्या साह्याने राजरोसपणे चोरी केली जात आहे़
या परिसरातील वाळू चोरीमुळे वाळवंटात मोठे खड्डे निर्माण होत आहेत़ प्रीतिसंगमावर दररोज लहान मुलांसह शेकडो नागरिक पोहण्यासाठी जातात़ त्यांच्यादृष्टीने हे खड्डे धोकादायक आहेत़ याशिवाय काही महिलाही धुणे धुण्यासाठी या परिसरात जातात़ खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एखाद्याला जीवही गमवावा लागेल, अशी परिस्थिती आहे़ कऱ्हाड शहरानजिक सैदापूरबाजूच्या वाळवंटातही उघड-उघड वाळू चोरी सुरू आहे़ अशा अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू चोरीवर प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे असते़ मात्र अनेक दिवसांपासून या परिसरातील वाळू चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे का?, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
संरक्षक भिंतीलाही धोका
प्रीतिसंगम बाग व स्मृतिस्थळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नदीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे़ या भिंतीमुळे पुराच्या पाण्यापासून बागेचे व स्मृतिस्थळाचे चांगले संरक्षण होत आहे़ मात्र, वाळूउपसा असाच सुरू राहिल्यास वाळवंटात खड्डे निर्माण होऊन नदीचे पात्र बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ त्याचा मोठा फटका संरक्षक भिंतीलाही बसू शकतो़
प्रीतिसंगम परिसरातील वाळवंटात काही महिन्यांपासून दररोज वाळू चोरी होत आहे़ या वाळू चोरीमुळे मोठे खड्डे निर्माण होत आहेत़ टेंभू योजनेत पाणी अडवल्यास हे खड्डे धोक्याचे ठरू शकतात़ हा बेकायदेशीर वाळूउपसा थांबवावा.
- प्रमोद वेर्णेकर, माजी नगरसेवक