कण्हेर, तारळीतून पाणी सोडले
By Admin | Updated: August 6, 2016 00:29 IST2016-08-05T23:03:12+5:302016-08-06T00:29:27+5:30
सहा प्रकल्प ओव्हरफ्लो : महाबळेश्वरजवळील चाळीस गावांचा संपर्क तुटला

कण्हेर, तारळीतून पाणी सोडले
सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात ८१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमधून सुमारे ४३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धोम, कण्हेर, वीर, उरमोडी, मोरणा-गुरेघर, तारळी प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. महाबळेश्वर परिसरातील चाळीस गावे संपर्कहीन
झाली आहेत.सातारा शहरासह महाबळेश्वर, वाई, पाटण, कऱ्हाड, जावळी तालुक्यांमध्ये शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोयना धरणात ५१,२४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांमध्ये कोयना येथे १३४, नवजा येथे २०७ तर १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण ते महाबळेश्वर या साठ किलोमीटर जलसाठ्याच्या विस्तीर्ण खोऱ्यातून विविध नाले-ओढे छोट्या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी कोयना धरणात मिसळत आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील पन्नास गावांना फटका बसला असून, काही गावांचा विद्युतपुरवठा बंद झाला आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. (प्रतिनिधी)
तीन वर्षांत प्रथमच ‘धोम’मधून पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढल्याने धोम धरणातून तीन वर्षांमध्ये प्रथमच शुक्रवारी पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. धरणातून १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेरमधून ८,६४०, वीर १३,६७१, उरमोडी २,०४७, मोरणा-गुरेघर ३,५७८, तारळी ५, ६ ८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पसरणी घाटात रस्ता खचला
पाचगणी : पाचगणी व परिसरात कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, दांडेघर (ता. महाबळेश्वर) या गावाजवळ पाचगणी-वाई या पसरणी घाटाच्या आरंभीच रस्ता खचल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असणारे संरक्षक कठडेच सरकून डोंगराच्या दिशेने गेले आहेत. या ठिकाणी डोंगरभागात जमीन सरकल्याने वृक्षसंपदाही मातीबरोबर वाहून गेली आहे.
चतुरबेट पूल पाण्याखाली
महाबळेश्वर : येथे शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. महाबळेश्वरपासून १४ किलोमीटर अंतरावरील वाडाकुंभरोशी येथील चतुरबेट पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे ३० ते ४० गावे संपर्कहीन झाली आहेत. महाबळेश्वरमध्ये २४ तासांत १५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणातून पायथा वीजगृहासाठी आज, शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून २,१११ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास दरवाजांतून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल.
- ज्ञानेश्वर बागडे,
कार्यकारी अभियंता, कोयना धरण.