कडाक्याच्या थंडीने ‘कांदा’ जोमात
By Admin | Updated: January 9, 2015 00:05 IST2015-01-08T21:31:48+5:302015-01-09T00:05:41+5:30
परळी खोऱ्यातील चित्र : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, उतारा चांगला मिळण्याची अपेक्षा

कडाक्याच्या थंडीने ‘कांदा’ जोमात
परळी : परळी खोऱ्यातील परिसरात दरवर्षीच रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून किंचित घट झाली असली तरी पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या कडक थंडीमुळे कांदा पिकाची वाढ जोमाने होत असून, उत्पादक वर्ग सुखावला आहे. या पिकांना थंडीची साथ मिळाल्याने उतारा चांगला मिळणार आहे. त्यामुळे वर्गाला चांगल्या दराची अपेक्षा आहे. यावर्षी कांदा दराने उच्चांक गाठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कांद्यासाठी पोषक अशी थंडी पडू लागली आहे. दरवर्षीच रब्बी हंगामात याठिकाणी कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जाते. या पिकाला थंडीची गरज भासते. थंडीची योग्य प्रमाणात साथ मिळाल्यास कांदाही आकाराला मोठा होऊन तो चांगला पोसला जातो. शिवाय त्यांची काढणीही चांगल्या प्रकारे साधली जाते.
यावर्षी कांद्याचे वाढलेले दर पाहून या भागातील शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यांपासून कांदा लावणीस सुरुवात केली; पण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवेळी पावसामुळे काही ठिकाणचे पीक हातचे जाण्याची परिस्थिती निर्माण णाली. मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने औषधांची फवारणी करून धोक्यात सापडलेले पीक जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीची साथ या आठवणींना मिळाल्याने उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्याची आशा शेतकरी वर्गाला लागून आहे.
या भागातील सोनवडी, गजवडी, भोंदवडे, डबेवाडी, अंबवडे व शेंद्रे परिसरातील बऱ्याच गावामधील शेतकऱ्यांनी उसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले आहे.(वार्ताहर)
थंडीमुळे पीक सुधारण्यास मदत
गेल्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. थंडीचा जोर विकासासाठी फायद्याचा ठरतो. कांद्याच्या पातीचा वेगळारंग प्राप्त होऊन काळोखी येते. तसेच रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्याशिवाय आवश्यक असणारा रंग प्राप्त होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कांद्याला सर्वच दृष्टीने थंडी फायदेशीर ठरते.