कमळाबाईचा घडा म्हणे ‘भरत’ आला !

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-01T21:58:14+5:302015-01-02T00:20:48+5:30

सुपरहिट

KamalBai Ghada says 'Bharat'! | कमळाबाईचा घडा म्हणे ‘भरत’ आला !

कमळाबाईचा घडा म्हणे ‘भरत’ आला !

‘ए कतीस डिसेंबरला साताऱ्याच्या हॉटेलचालकांनी दिली फॅमिली कस्टमरला एक-एक छत्री फ्री,’ ही कुणकुण लागताच इंद्र दरबारात देवाधिराजांनी विचारलं, ‘साताऱ्यात हे कसलं नवीन मार्केटिंग सुरू झालंय नारदा?’ मुनींनी उत्तर दिलं, ‘तुमचीच कृपा महाराऽऽज. तुम्ही कडाक्याच्या थंडीत पाऊस पाडू लागलात. स्वेटर घालून मोती चौकात गरम दूध प्यायला गेलेली मंडळी चिंब पावसात भिजून घरी परतली, म्हणून हॅपी न्यू ईयर पार्टीला हॉटेलवाल्यांनी छत्रीची शक्कल लढविली.’ देवाधिराज हसले, ‘छत्री घेऊन का होईना, पेठकरी सातारकर एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतोय, हे बदलत्या साताऱ्याचं प्रतीक म्हणायचं.’
एवढ्यात मेनकेनं रंभेला हळूच हातानं ढोसलं, ‘काहीही म्हण.. पण आजकाल सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांकडं भलताच पैसा खुळखुळू लागलाय.’ रंभा दचकून म्हणाली, ‘काय म्हणतेय काय?... पण आता सत्ता कुठाय गं त्या नेत्यांच्या हातात? आठपैकी सात आमदार विरोधी पक्षाचे. एकमेव शंभूराज; ते पण लाल-दिव्याशिवाय रिकाम्या हातानं परतलेले.’ तेव्हा मेनकेनं हळूच एक माहिती पुरविली, ‘नागपुरातून आल्यापासून म्हणे, शंभूराजच्या हातात पत्रकांचा गठ्ठाच गठ्ठा दिसतोय. अधिवेशनात ते सकाळी काय बोलले, दुपारी कोणत्या मंत्र्याला भेटले, संध्याकाळी कुणाला निवेदन दिलं.. याची जंत्रीच असलेल्या प्रेसनोटचं बाड घेऊन त्यांच्या मागं माळींचा मिलिंद फिरतोय.’ नारदमुनींनी दोघींच्या संभाषणात उडी घेतली, ‘कोयनेच्या पात्रातल्या घुसखोर वीटभट्टीचालकांची यादीही आहे बरं का, त्या गठ्ठ्यात.’ रंभेनंही पुढं पुस्ती जोडली, ‘होय. होय. त्या भट्ट्यांची बाजू घेऊन विक्रमबाबाही दमलेत. काहीही म्हण... पाटण तालुक्यात राजकीय भट्ट्या मात्र भलत्याच गाजू लागल्यात बरं का गं.’
देवाधिराजांनी पुन्हा मूळ विषयाला हात घातला, ‘पण पैशाचं काय? कुणाकडं खुळखुळतोय एवढा पैसा?’ नारदमुनींनी इकडं-तिकडं बघत हळू आवाजात बोलायला सुरुवात केली, ‘विधानसभा निवडणुकीत एका पक्षाच्या अध्यक्षाला लॉटरी फुटली. पार्टीचा प्रचारनिधी त्यांच्या उमेदवारांपर्यंत पोहोचलाच नाही. अध्यक्षाच्याच घरात ‘खोकी’ भरून झाकून ठेवला गेला. सैनिक रणांगणात उपाशीपोटी गेले. सेनापती मात्र एका रात्रीत मालामाल झाला.. पण असं मी नाही, त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरपर्यंत तक्रार केलीय.’ दरबार बुचकळ्यात पडला, ‘अरे.. पण तो अध्यक्ष कोणत्या पक्षाचा? अन् तक्रार करणारे महाभाग कोण?’
मुनींनी मान हलविली, ‘नाही महाराज; पक्ष अत्यंत शिस्तीचा. त्यामुळं ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवलीय. तक्रारदारही एकमेकांचे कट्टर विरोधक; पण अध्यक्षाचा भांडाफोड करण्यासाठी एकत्र आलेत. पक्षाच्या उमेदवाराला जिल्हाध्यक्षाच्याच गावात फक्त १९ मते मिळालीत. केवळ सेटिंगसाठी म्हणे, या अध्यक्षानं बऱ्याच ठिकाणी कमकुवत उमेदवार दिले... पण असं माझी नाही, त्यांच्याच पदाधिकाऱ्यांची तक्रार. घड्याळवाल्यांबरोबर सेटिंग करणारा जिल्हाध्यक्ष, अशा भाषेत त्यांचाच आरोप.’
मुनींच्या तोंडून या अध्यक्षाचे एकेक कारनामे ऐकताना सारेच चाट पडत होते. कोरेगावची जागा सोडण्यासाठी ‘ल्हासुर्णे’करांसोबत सेटिंग असो, की तिकीट वाटपासाठी ‘कृष्णा’कारांसोबत डिलिंग असो. ‘तिकीट पाहिजे असेल तर प्रचारनिधीवर हक्क दाखवायचा नाही.’ असा ‘खंडाळा’करांसोबत केलेला ‘उत्तमोत्तम’ तह असो, की वरून आलेली कैक ‘खोकी’ न फोडता केवळ किरकोळ ‘पेटी’त पक्षाच्या उमेदवारांची केलेली बोळवण असो. प्रत्येक किस्सा भन्नाट होता; पण हे सारं सांगताना मुनी शेवटी एकच वाक्य टाकायचे, ‘हे मी नाही बरं का; पक्षाचे पदाधिकारी म्हणतात.’
अखेर न राहवून देवाधिराजच म्हणाले, ‘पण शेवटच्या टप्प्यात सापडलेल्या सात पेट्या कुणाच्या? पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्यासाठीच घेऊन चालले होते ना ते?’ हे ऐकून मुनी खोचकपणे म्हणाले, ‘मतदानाच्या आदल्या रात्री एवढ्या झटपट कुठं वाटप होणार होतं, इतक्या पेट्यांचं महाराऽऽज? तेवढा वेळ तरी होता का उमेदवारांच्या हातात शिल्लक? असं मी नाही बरं का, त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते विचारताहेत.’ आता मात्र अनेकांची सहनशीलता संपली. रंभेनं तिरकसपणे विचारलं, ‘पण हे कार्यकर्ते नेमके कोण? नाव-गाव-बिव काही आहे का नाही त्या पक्षाचं? बिरबलाच्या मेलेल्या पोपटाची कथा अजून किती रंगविणार?’
आता जास्त ताणण्यात अर्थ नाही; हे ओळखून मुनींनी सांगून टाकलं, ‘नागपूरच्या पंतांकडं धाव घेणारे कोण, हे तुम्ही ओझर्डेच्या फरांदेंना विचारा. नाहीतर परळी खोऱ्यातल्या दत्ताजींना. अधिक चौकशी पाटलांच्या सुवर्णातार्इंकडं करा किंवा शुभदा वकिलीणबार्इंकडं.’ देवाधिराजांनी सारा संदर्भ ओळखला. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत साताऱ्यात काय-काय राजकीय भूकंप होणार, हेही ताडलं. गालातल्या गालात हसत त्यांनी जाहीर केलं, ‘म्हणजे जिल्ह्यातल्या कमळाबाईचा घडा ‘भरत’ आला म्हणायचा.’

 

सचिन जवळकोटे

Web Title: KamalBai Ghada says 'Bharat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.