‘कलारंग’मध्ये गीत-नृत्यांची उधळण !
By Admin | Updated: July 21, 2014 23:07 IST2014-07-21T22:58:45+5:302014-07-21T23:07:58+5:30
सातारा : शेरोशायरी, मॅजिकचीही अनुभूती

‘कलारंग’मध्ये गीत-नृत्यांची उधळण !
सातारा : लावणी, कोळी नृत्य, शेरोशायरी, किस्से यांनी रंगलेल्या ‘कलारंग’ कार्यक्रमात गीत-नृत्यांची खऱ्या अर्थाने उधळण झाली. त्याचबरोरच मॅजिक शोच्या अनुभूतीने सर्वचजण अवाक् झाले. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमात सखींनीही नृत्य करून आनंद लुटला.
येथील शाहू कला मंदिरमध्ये ‘लोकमत सखी मंच’ आयोजित सह्याद्री इव्हेंटसच्या जादूगार गोरख प्रस्तुत ‘कलारंग’ एक व्हरायटी शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन रवींद्र पवार यांनी केले. यावेळी सिद्धी पवार, विनोद लाहोटी, गोरख जाधव, राम सूर्यवंशी, प्रसाद ओक, श्रीमंत शेळके उपस्थित होते.
खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम कलाकारांनी गीत-नृत्यांनी सजवला होता. त्यामुळेच अनेक गीतांना सखींकडून ‘वन्स मोअर’ मिळत होता. कार्यक्रमाची सुरुवात जादूगार गोरख यांच्या मॅजिक शोने झाली. जादूगार गोरख यांनी पिशवीत फुले टाकून त्याचा हार करून दाखविणे, मेणबत्ती पेटवून त्यातून फुलांचा गुच्छ काढणे, गोल रिंगची चौकट तयार करणे, कोरी वही दाखवून त्यात पुन्हा चित्र दाखविणे, मोकळ्या बॉक्समधून वस्तू बाहेर काढणे, पाण्याचा रंग बदलणे, असे हात चलाखीचे जादूचे प्रयोग दाखवून सर्वांनाच अवाक् केले.
गीत-नृत्यांचा कार्यक्रमात प्रथम ‘देवा श्री गणेशा’ हे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर स्नेहा यांनी ‘या रावजी , बसा भावजी.., कशी मी राखू तुमची महरजी’ ही लावणी सादर केली. या लावणीच्या वेळी टाळ्यांबरोबरच शिट्याही वाजवून प्रतिसाद देण्यात आला. प्राजक्ता यांनी सादर केलेल्या ‘प्रीतम प्यारे’ या गीतालाही सखींनी दाद दिली. मास्टर सॅम आणि प्रदीप यांच्या रिमिक्स गीताने तर धम्माल उडवून दिली. आशा यांच्या ‘चांदण चांदण झाली रात’ या कोळी नृत्यावर टाळ्यांचा पाऊस पडला.
या कार्यक्रमात चंदुकाका सराफ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या विजेत्या मीनाक्षी जाधव या ठरल्या. तसेच यावेळी वरद फर्निशिंग यांच्या मार्फत दोन कर्टन सेट, लाहोटी कलेक्शनतर्फे तीन साड्या, इम्प्रेशन ब्युटी पार्लरतर्फे पाच फेशियल, समन्वय लँग्वेज स्कूलच्या वतीने तीन स्पोकन इंग्लिश कोर्स, सिद्धी ब्युटी पार्लर तर्फे ५० ब्लीचचा लकी ड्रॉ काढण्यात आला. चकोर बेकरीच्या सौजन्याने जुलै महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सखींचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात
आला. (प्रतिनिधी)
सखींचेही नृत्य...
प्राजक्ता यांनी ‘ही पोरी साजूक तुपातली’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यावर सखींनीही नृत्य करून आनंद लुटला. या कार्यक्रमात ‘गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी,’ या गाण्याबरोबरच ‘नाकी डोळी छान, रंग गोरा-गोरा पान’ सारखीही लावणी झाली. उत्तरोत्तर ‘कलारंग’ कार्यक्रम आणखी उंचीवर गेला.
या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व महिलांच्या विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या साताऱ्यातील जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार आणि आयुर्वेदातील प्रसिद्ध प्रकृती हेल्थ रिसॉर्ट यांनी स्वीकारले होते.