ज्योती केनियात ड्रग्सचे रॅकेट चालवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:10+5:302021-03-25T04:38:10+5:30

सातारा : जिल्ह्यातील गाजलेल्या वाई हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून, उलटतपासामध्ये माफीची साक्षीदार ज्योती मांढरेवर अनेक आरोप करण्यात ...

Jyoti runs a drug racket in Kenya | ज्योती केनियात ड्रग्सचे रॅकेट चालवते

ज्योती केनियात ड्रग्सचे रॅकेट चालवते

सातारा : जिल्ह्यातील गाजलेल्या वाई हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून, उलटतपासामध्ये माफीची साक्षीदार ज्योती मांढरेवर अनेक आरोप करण्यात आले. ज्योती ही केनिया देशाच्या संपर्कात होती. ती ड्रगचे रॅकेट चालवीत असल्याचा आरोपही बचाव पक्षाने केला. मात्र ज्योतीने हे सर्व आरोप फेटाळले.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना अ‍ॅड. मिलिंद ओक सहकार्य करीत आहेत. या खटल्याची सध्या माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिचा उलटतपास सुरू आहे. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत हुडगीकर हे काम पाहत आहेत. गेल्या चार सुनावण्यांपासून ज्योती मांढरेचा उलटतपास सुरू आहे. बुधवारीदेखील पुन्हा उलटतपासाला सुरुवात झाली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात ज्योतीला थेट तिचे केनिया देशाशी संबंध असून ती ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. हे आरोप ज्योतीने खोडून काढले. ज्योतीचे नातेवाईक केनिया देशात असून ख्यालीखुशालीसाठी केनियामधून फोन आले असल्याचा दावा तिने केला. यासह विविध बाजू तिने मांडली.

बचाव पक्षातर्फे ज्योतीवर आणखी दोन खुनाचे आरोप करण्यात आले. यावरदेखील ज्योतीने न्यायालयात मुद्देसूद माहिती दिली. दिवसभर चाललेल्या या उलटतपासामुळे दिवसेंदिवस या खटल्याच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे वाई हत्याकांड सुनावणी संबंधितांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बुधवारी या खटल्याच्या सुनावणी झाल्यानंतर आज, गुरुवारी पुन्हा त्याची सुनावणी होणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

Web Title: Jyoti runs a drug racket in Kenya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.