खिशात बस पास.. तरीही रिक्षातून प्रवास !

By Admin | Updated: August 12, 2015 20:45 IST2015-08-12T20:45:07+5:302015-08-12T20:45:07+5:30

स्थानक इमारत पाडण्यास प्रारंभ : प्रवासी, विद्यार्थ्यांना करावा लागतेय पायपीट; रिक्षा-वडाप व्यावसायिकांकडून लूट

Just pass in the pocket .. still travel from autos! | खिशात बस पास.. तरीही रिक्षातून प्रवास !

खिशात बस पास.. तरीही रिक्षातून प्रवास !

संतोष गुरव - कऱ्हाड -अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेले येथील जुने बसस्थानक पाडण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. मात्र, स्थानकाचे केले जाणारे बांधकाम आता विद्यार्थी व प्रवाशांसाठी डोकेदुखीच बनले आहे. कारण महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांना स्थानकाच्या स्थलांतराने शहराबाहेरून शहरात पायी प्रवास करावा लागत आहे. तर काहीजण एसटी पास असून देखील स्वत:च्या खिशाची पदरमोड करत रिक्षातून प्रवास करत आहे. याचाच फायदा घेत काही रिक्षा वडाप व्यावसायिकांकडून प्रवासी व विद्यार्थ्यांकडून जादा प्रवास भाडे आकारून त्यांची लूट करत असल्याचे खुद्द प्रवासी व विद्यार्थी सांगत आहेत.
बसस्थानकाच्या बांधकामास प्रारंभ झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. आगार प्रशासनाने शहरातील तीन ठिकाणी एसटी थांबे उभारले आहेत. कोल्हापूर नाका, भेदा चौक, साई बाबा मंदिर परिसर तसेच नवग्रह मंदिर परिसर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशांच्या सेवेसाठी बसथांबे उभारले आहेत. मात्र, या ठिकाणी प्रवासी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता त्याचा फायदा हा काही रिक्षा वडाप व्यावसायिक प्रवाशांकडून जादा प्रवासभाडे आकारत आहेत. रिक्षा वडाप व्यावसायिकांकडून एका किलोमीटरसाठी वीस-तीस रुपये प्रवास भाडे आकारून लुबाडणूक केली असल्याचा अनुभव हा काही प्रवाशांनाही आला आहे. अशा प्रकारे होत असलेल्या लुबाडणुकीच्या प्रकाराबाबत पोलीस यंत्रणेने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी व विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्रिपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंजूर केलेल्या ११ कोटी निधीतून स्थानकाचे बांधकाम केले जात आहे. विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आगार प्रशासनातर्फे बसस्थानकालगत तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थी व प्रवाशांना बसण्यासाठी बांधण्यात आले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असल्याने या ठिकाणी विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यातच प्रवासी व विद्यार्थ्यांच्या संख्येपुढे एसटी बस कमी पडत असल्याने वडाप व्यावसायिकांनी आपली वाहने या ठिकाणी उभी करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असूनही तेथे काही वडाप व्यावसायिक व एका रिक्षा संघटनेकडून रिक्षा थांबा तयार करण्यात आला असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना कोल्हापूर नाका तसेच भेदा चौक या ठिकाणी उतरावे लागत आहे. तेथून शहरात येण्यासाठी एक ते दोन किलोमीटर अंतर असल्याने वृद्ध प्रवाशांना रिक्षा करावी लागत आहे. एसटी शहरात जात नसल्याने याचा फायदा घेत काही रिक्षा वडापचालक अशा वयोवृद्ध प्रवाशांकडून जादा प्रवास भाडे आकारणी करत त्यांची लुबाडणूक करत आहेत.

नाक्यावर वाहतूक कोंडीत वाढ...
नवीन बसस्थानकाच्या कामास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी असलेली जागेची अडचण विचारात घेता अन्य जिल्ह्यातून येथील बसस्थानकावर येणाऱ्या बस कोल्हापूर नाक्यावरच थांबविण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर होणारी प्रवाशांची गर्दी, वडाप गाड्या व आराम बसचा थांबा आणि त्यातच एसटी थांबत असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरच रिक्षा थांबा
कऱ्हाड बसस्थानक पाडण्यास प्रारंभ झाला असल्याने स्थानकाबाहेर शेड उभे करून तेथे बस थांबविल्या जात आहेत. बसस्थानकांसमोर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असल्याने कार्यालयासमोरच काही रिक्षा वडाप व्यावसायिकांनी आपला रिक्षा थांबा उभारला आहे. रिक्षा थांबा उभारण्यासाठी यांना कुणी परवानगी दिली असल्याचे प्रवासी व विद्यार्थ्यांत बोलले जात आहे.

बसस्थानकाच्या कामामुळे शहरात ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसथांबे उभारण्यात आले आहे. तरी शहरातील मुख्य बसस्थानकात मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी येत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही आमच्या रिक्षा उभ्या केल्या आहेत.
- शिवाजी जाधव,
रिक्षा व्यावसायिक, कऱ्हाड

कऱ्हाड बसस्थानकाच्या रखडलेल्या कामास सुरुवात झाली असल्याने समाधान वाटते. मात्र, बांधकामामुळे आता प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. स्थानकाच्या बांधकामामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना शहराबाहेरून चालत यावे लागत असल्याने आगारप्रमुखांनी शटल बससेवा सुरू केल्यास विद्यार्थी व प्रवाशांची चांगली सोय होईल
- अभिजित गरूड, युवक,
येणके, ता. कऱ्हाड

सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी अवस्था!
बसस्थानकाच्या बांधकामास प्रारंभ झाला असल्याने शहरातील तीन ठिकाणी बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले आहे. त्यामुळे काही बस कोल्हापूर नाका परिसरात तर काही भेदा चोकात थांबविल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना तेथून चालत अथवा रिक्षाने शहरात यावं लागत आहे. या होणाऱ्या त्रासामुळे ‘सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी अवस्था विद्यार्थी व प्रवाशांची झाली आहे.

Web Title: Just pass in the pocket .. still travel from autos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.