कांचनच्या टॅक्सीची राज्यभर भ्रमंती-: हजारो कीलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:20 IST2018-03-07T23:20:00+5:302018-03-07T23:20:00+5:30
सातारा : आत्तापर्यंत आपण टुरिस्ट व्यवसायामधील वाहनांवर पुरुष चालक पाहत आलो आहोत. रात्री-अपरात्री भाडे मिळाल्यानंतर चालकाला कुठेही जावे लागते.

कांचनच्या टॅक्सीची राज्यभर भ्रमंती-: हजारो कीलोमीटरचा प्रवास
दत्ता यादव ।
सातारा : आत्तापर्यंत आपण टुरिस्ट व्यवसायामधील वाहनांवर पुरुष चालक पाहत आलो आहोत. रात्री-अपरात्री भाडे मिळाल्यानंतर चालकाला कुठेही जावे लागते. त्यामुळे या व्यवसायामध्ये केवळ पुरुषांचीच मक्तेदारी आपल्या पाहायला मिळत होती. मात्र, सातारा तालुक्यातील आरे या गावातील कांचन महाडिक याला अपवाद ठरली आहे.
कांचन महाडिकने पुरुषांची मक्तेदारी चक्क मोडीत काढीत तीनशे किलोमीटरहून अधिक ड्रायव्हिंग करून रात्रीचा प्रवास तिने पार केला आहे. पॅसेंजर म्हणून ती महिलांचीच निवड करत असून, तिच्या या धाडसीपणा आणि जिद्दीला सातारकर सलाम करीत आहेत. भाऊ नसल्याची खंत न करता आई-वडिलांच्या पाठबळावर तिन्ही बहिणींनी स्वत:च्या पायावर शिक्षण पूर्ण केले. त्यापैकीच एक सर्वात धाकटी कांचन. धाडसी आणि जिद्दी असलेल्या कांचनने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
घरात वडिलांच्याशिवाय कमावते कोणी नसल्याने आपणही काहीतरी करावं, असं तिला वाटू लागलं. त्यामुळे तिनं साताºयातील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं. चक्क सहा महिन्यांत तिनं चारचाकी चालविण्याचं आव्हान पेललं. एवढ्या कमी दिवसांत सफाईदार आणि फरफेक्ट ड्रायव्हिंग शिकल्यामुळे तिला त्याच संस्थेमध्ये महिलांना ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी तिची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. आयुष्यातील पहिली नोकरी म्हणून तिनं हे आव्हान स्वीकारलं.
सलग चार वर्षे तिनं महिलांना कार चालविण्याचे प्रशिक्षण दिलं. मात्र, यात तिला फारसा मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे केवळ महिलांनाच ड्रायव्हिंग शिकवत बसण्यापेक्षा आपणही साताºयाच्या बाहेर टुरिस्ट घेऊन जाऊ शकतो, असा विश्वास तिच्यामध्ये निर्माण झाला. सुरुवातीला छंद म्हणून जोपासलेली ड्रायव्हिंग आता व्यवसाय बनला आहे. परंतु हा व्यवसाय करताना तिनं स्वत:ला काही अटी घालून घेतल्या. केवळ टुरिस्ट म्हणून महिलांनाच आपल्या कारमध्ये घ्यायचं आणि जिथं भाडे मिळेल तिथं जायचं. साताºयातील महिलांना कांचनबाबत माहिती मिळाल्यानंतर तिच्याकडे टुरिस्टसाठी महिलांचा ओघ सुरू झाला. गणपतीपुळे, वेळणेश्वर, चिपळूण, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी तिनं महिलांना भ्रमंतीसाठी नेलं आहे.
भले-भले रात्रीची गाडी चालविण्यास धजावत असताना कांचनला मात्र रात्रीची कार चालविणे काहीही अवघड वाटत नाही. मात्र, रात्रीचा प्रवास करताना वाटेत कोठेही गाडी थांबवायची नाही, हा कटाक्ष ती पाळते. या आगळ्या वेगळ्या धाडसामुळे कांचनच्या टुरिस्ट व्यवसायामध्ये चांगला जम बसला आहे. सध्या कांचन आणि तिची मैत्रीण प्राजक्ता टेकाळे या दोघी महिलांना कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच हा व्यवसायही सांभाळत आहेत.
तिच्या भरवशावर आम्ही निर्धास्त..
कांचनने महाराष्ट्रभर भ्रमंती केली असून, आत्तापर्यंत तिने पाच हजारांहून अधिक किलोमीटर कार चालविली आहे. ती कार चालविताना महिलाही अगदी निर्धास्त असतात. तिच्या भरवशावर गणपतीपुळे, वेंगुर्ले येथे दोन दिवस भ्रमंतीला जाऊन आलो. सर्व महिलाच असल्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करता आला, असे प्रिया माने हिने सांगितले.
लग्न समारंभ असले की कांचनला आवर्जून बोलावलं जातं. नवरी मुलीला वाजत-गाजत कारमधून नेले जाते. त्या कारची सारथी केवळ कांचनच असते.