जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
By Admin | Updated: February 9, 2015 00:47 IST2015-02-08T21:39:21+5:302015-02-09T00:47:31+5:30
सातारा-सज्जनगड रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
परळी : डबेवाडी,ता. सातारा गावानजीक सातारा-सज्जनगड रस्त्यावरच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे सपाटीकरण केले आहे. यामुळे रस्त्याशेजारील सुमारे चार-पाच महाकाय वटवृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत काही लोकांनी सूचना दिली असली तरी बांधकाम विभागाला याबाबत काही लोकांनी सूचना दिली असली तरी बांधकाम विभाग कोणाच्या हद्दीत झाडे आहेत याची चौकशी करीत आहे.
सज्जनगड-ठोसेघर, उरमोडी धरण या परिसरात पर्यटकाचा ओढा वाढला आहे. त्यातच सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवही सुरू झाला आहे. त्यामुळे सातारा-सज्जनगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत आहे. ही वर्दळ वाढतेय; परंतु येथे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कारण डबेवाडी गावानजीकच असणाऱ्या अनेक जमिनी मोठ-मोठ्या धनिकांनी विकत घेतल्या आहेत. वेगवेगळे प्रकल्प आणून विकसित करण्यासाठी ते याचा वापर करीत आहेत. येथे अनेकांनी शेतीचे सपाटीकरण करून घेतले आहे; परंतु हे सपाटीकरण करताना त्यांनी विचार न करता येथील महाकाय असणाऱ्या वटवृक्षाच्या मुळ्या, बुंधे काढून टाकले आहेत. ही झाडे सोसाट्याचा वारा किंवा वळवाचा पाऊस झाला तर रस्त्यातच कोसळू शकतात. रस्त्यावर कोसळल्याने जीवितहानी होऊ शकते, वाहतूक ठप्प होऊ शकते; परंतु याचा विचार न करता सार्वजनिक बांधकाम विभाग आपली हद्द कोठून सुरू होते आणि संपते याची कागदोपत्री चौकशी करत आहे. ही झाडे पूर्णता निकामी झाली आहेत. (वार्ताहर)
फांद्यांचा धोका
सातारा-सज्जनगड रस्त्यावर प्रवास करणारे वाहनचालक वारे वेगाने सुटले असेल तर त्याठिकाणी आल्यास गाडीला ब्रेक लावून थांबतात व नंतरच निघून जातात. अनेकवेळा या झाडांच्या छोट्या-छोट्या फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
डबेवाडीकडे जाताना माळावरील रानाकडे आल्यावर वाहन चालविताना भीती वाटते. रस्त्याकडेच्या झाडांकडे पाहात जावे लागते. कारण सोसाट्याचा वारा सुटल्यास फांद्या वाजण्याचा आवाज येतो. त्यामुळे ते महाकाय वृक्ष कोसळतील की काय, याची भीती वाटते.
-रणजित माने, वाहनचालक