जीवा-शिवाची बैलजोडं.. आता झुरत्यात दावणीपुढं!
By Admin | Updated: April 22, 2015 00:29 IST2015-04-21T22:43:06+5:302015-04-22T00:29:29+5:30
शर्यत बंदीचा परिणाम : पशुधन पोसताना बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं

जीवा-शिवाची बैलजोडं.. आता झुरत्यात दावणीपुढं!
नीलेश भोसले - सायगाव : काळा कुळकुळीत रंग, दगडी मस्तक, घागरीएवढं वशींड, नुसता फुरफुरला तरी रस्त्यावरचा धुरया उडवणारा ‘खिलार’ जातीचा ‘शिवराज.’ तीन जिल्हे आणि तेरा तालुक्यांमधून तब्बल दिडशेपेक्षा जास्त मैदानं मारलेला ‘शिवराज’ बैल आज दावणीवर टाचा घासत उभा आहे. बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातलेल्याला जवळपास एक वर्ष उलटत आलं तरी बंदी उठवण्याची काहीही चिन्हं दिसत नसल्यामुळं लाखमोलाचं पशुधन पोसता पोसता बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महामुलकरवाडी, ता. जावली येथील शेतकरी शरद राजाराम महामुलकर यांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी उंब्रज येथून तीन लाख रुपये किमतीचा खिलार जातीचा बैल घेतला होता. केवळ छंदापोटी घेतलेला हा बैल विविध स्पर्धांमधून बक्षिसे मिळवत होता; परंतु वर्षभरातच बैलगाड्या शर्यतीवर बंदी आल्याने हे लाखमोलाचं पशुधन फक्त पोसण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. महिन्याकाठी एका बैलाचा दहा ते बारा हजार रुपये खर्च होत असल्याने आणि आज ना उद्या शर्यतीवरील बंदी उठेल, या आशेपोटी ही जीवापाड जपलेली जनावरे कर्ज काढून जगवण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
ही व्यथा कुणा एका ‘शिवराज’ बैलाची किंवा शरद महामुलकरांची नाही. ही व्यथा शर्यतबंदीचा फटका बसलेल्या हजारो बैलमालकांची आहे. जे सरकारने घातलेली बंदी उठण्याकडे डोळे लावून बसले आहेत. वास्तविक पाहता शर्यतीतून फारशी आर्थिक मियकत होत नाही. वाहतूक खर्च, जॅकीचे मानधन जाता फार कमी रक्कम हातात मिळते. हा धोका पत्करून केवळ छंदापोटी आणि शर्यतीची परंपरा टिकवण्यासाठी बैल पाळले जातात.शर्यत बंदीमुळे खेडोपाड्यातील जत्रा आणि त्यावर बेतलेली आर्थिक गणितं कोलमडून पडली. यांत्रिकीकरणामुळं कमी होणारं पशुधन भविष्यात खिलार गायी नामशेष करेल. हे पशुधन वाचायचं असेल तर शर्यतीवरील बंदी उठवणं अगत्याचं आहे, असं जाणकार सांगत आहेत.
एका बैलापाठीमागं महिन्याकाठी होणारा खुराकाचा खर्च
खपरी पेंड १ पोतं, गहू भुस्सा १ पोतं, मका चुणी १ पोतं, ओला आणि सुका चारा अंदाजे १०० पेंडी, सर्व मिळून सरासरी १० ते १२ हजार खर्च, याव्यतिरिक्त औषधपाणी, वाहतूक खर्च.
अश्ी राखली जाते बैलांची निगा
दररोज नित्यनियमाने मालीश, दोन दिवसातून एकदा अंघोळ, शिंग, खूर, डोळ्यांची विशेष निगा, पंधरा दिवसांतून एकदा पाय मोकळ करण्यासाठी फेरफटका.
हा छंद जीवाला लावी पिसे..!
शर्यतीवरच्या प्रेमापोटी घेतलेला ‘शिवराज’ आज आमच्या कुटुंबाचा सदस्य झाला आहे. नुकताच त्याचा आम्ही धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्यासाठी केकही आणला होता. आज सरकार जनावरांचे हाल होवू नये म्हणून शर्यतीवर बंदी आणत आहे. स्वत:च्या मुलासारखा ज्या जनावरांचा सांभाळ केला, त्याला कुठलाही जातीवंत मालक स्वप्नातसुध्दा त्रास देणार नाही. आज चौखुर उधाळणारं जनावर असं दावणीला उभं बघून काळीज तीळ तीळ तुटतंय..!
- शरद महामुलकर (बैलमालक)