कृष्णेची पातळी खालावल्याने जॅकवेल उघडे...
By Admin | Updated: November 19, 2015 00:41 IST2015-11-19T00:05:26+5:302015-11-19T00:41:41+5:30
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न : धरणातून पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

कृष्णेची पातळी खालावल्याने जॅकवेल उघडे...
कोपर्डे हवेली : कृष्णा नदीची पाणीपातळी खालावल्याने नदीकाठच्या गावातील नळपाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडले आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणून वापरावे लागत आहे. जॅकवेल उघडे पडल्याने नदी पात्रात धरणातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांतून होत आहे.
यावर्षीचा पाऊस बऱ्याच अंशी कमी प्रमाणात पडल्याने विहिरींसह ओढे, नाले व नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. कृष्णा नदीच्या पात्रातून अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तर काही लहान गावांमध्ये नदीकाठावर बोअर मारून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने गावच्या पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडले आहेत. कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीने ज्याठिकाणी पाण्याचा साठा आहे. त्याठिकाणाहून सुमारे ४०० फुटांवरून पाणी टाकीत सोडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत गावची यात्रा असल्याने पाण्याची समस्या भेडसावण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
तासवडे, शिरवडे, नडशी, वहागाव, घोणशी गावांतील पाण्याची पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. प्रशासन व संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
साथीच्या आजारांचेही संकट...
नदीपात्रात पाणी पातळीत कमालीची घट झाली असून, उपलब्ध पाणी अशुध्द असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस नदीच्या पाणीपातळीत घट होत असल्याने ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करत आहे. यात्रेसाठी वेळ पडल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.
- नेताजी चव्हाण, उपसरपंच,
कोपर्डे हवेली.
नळपाणीपुरवठा योजनेबरोबरच पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यासाठी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात व नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी.
- निवास थोरात, उपसरपंच, नडशी
पाणी उपसाविना पडून असलेले जॅकवेल...
कृष्णा नदी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने पाणी उपसा करणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे जॅकवेल उघडे पडले आहे.