जीपवर झाड कोसळून दहा जखमी

By Admin | Updated: April 25, 2015 00:01 IST2015-04-25T00:00:01+5:302015-04-25T00:01:17+5:30

दहाजण गंभीर : पाटण-कऱ्हाड मार्गावर अडूळ येथे दुर्घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक

Jeep tree collapses in collapse | जीपवर झाड कोसळून दहा जखमी

जीपवर झाड कोसळून दहा जखमी

मणदुरे : धावत्या वडाप जीपवर अचानक वडाचे झाड कोसळल्याने दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. पाटण-कऱ्हाड मार्गावर अडूळ गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण ते कऱ्हाडपर्यंत मल्हारपेठ गावापर्यंत रस्त्यानजीक वडाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या मोडून अनेकवेळा रस्त्यावर पडतात; मात्र या झाडांमुळे आजपर्यंत कधीही मोठी दुर्घटना घडली नव्हती. दरम्यान, आडूळ हद्दीत असणाऱ्या एका वडाच्या झाडाच्या बुंध्याला अज्ञाताने आग लावली होती. दोन दिवसांपासून झाडाचा बुंधा आगीने धुमसत होता. शुक्रवारी दुपारी पाटणहून कऱ्हाडकडे प्रवासी घेऊन निघालेली जीप (एमएच ११ एफ १२५८) अडूळनजीकच्या साटम आश्रम येथे आली असताना अचानक वडाचे झाड या जीपवर कोसळले. यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. वडाच्या झाडाखालीच जीप सापडल्याने प्रवासी जीपमध्येच अडकून पडले. परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना जीपमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुऱ्हाडीच्या साह्याने काही फांद्या तोडून प्रवाशांना जीपमधून बाहेर काढले गेले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविले. पाटणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Jeep tree collapses in collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.