जेसीबीने रॅम्प फोडून अडकलेल्या म्हशी बाहेर
By Admin | Updated: November 7, 2015 23:40 IST2015-11-07T22:57:22+5:302015-11-07T23:40:28+5:30
महाबळेश्वरातील सर्व्हिस सेंटरमध्ये थरार

जेसीबीने रॅम्प फोडून अडकलेल्या म्हशी बाहेर
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य रस्त्यावरील वाहने धुण्याच्या सर्व्हिस सेंटरमधील रॅम्पमध्ये अडकलेल्या २ म्हशींना वाचविण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना यश आले.
लिंगमाळा येथे जांभळे यांचे सर्व्हिसिंग सेंटर असून, येथे ३ फूट रुंद व ५ फूट खोलीच्या दोन रॅम्पमध्ये दोन म्हशी रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने अडकल्या. या म्हशी रात्री सातच्या दरम्यान पडल्या असल्याचा अंदाज आहे, रात्री नऊच्या दरम्यान येथे असणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्वरित महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना ही माहिती दिली. दोन तासांच्या वर ट्रेकर्सचे जवान म्हशी काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. ज्या रॅम्पमध्ये या म्हशी अडकल्या होत्या, तो रॅम्प तोडण्यास रात्रीच्या काळोखात सुरुवात झाली. मात्र, दोन-तीन तास प्रयत्न करूनही म्हस निघत नसल्याचे लक्षात आल्याने महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मदतीने रात्री बाराच्या दरम्यान जेसीबी मागविण्यात आला. या जेसीबीच्या साह्याने अडकलेल्या दोन म्हशी बाहेर काढण्यात यश आले.
कडाक्याच्या थंडीत रात्री जर या दोन अडकलेल्या म्हशी काढल्या नसत्या तर दोन मुक्या प्राण्यांचे प्राण वाचले नसते. मात्र ट्रेकर्सच्या जवानांना स्थानिकांच्या मदतीने दोन मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. या मदतकार्यात विशाल तोष्णीवाल, ट्रेकर्सचे नीलेश बावळेकर, सनी बावळेकर, सुनील भाटिया, अक्षय व अमित माने, प्रथमेश जांभळे, संदीप जांभळे, जयवंत जांभळे, शंकर बावळेकर, ओमकार नाविलकर व जेसीबी चालक शिंदे, शिवाजी खंडझोडे हे आघाडीवर होते. (प्रतिनिधी)