कृष्णा महाविद्यालयात जयवंतराव भोसले अध्यासन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:49+5:302021-02-05T09:13:49+5:30
डॉ. साळुंखे यांनी जयवंतराव भोसले अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांनी केंद्राची उद्दिष्टे व उपक्रमही ...

कृष्णा महाविद्यालयात जयवंतराव भोसले अध्यासन केंद्र
डॉ. साळुंखे यांनी जयवंतराव भोसले अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांनी केंद्राची उद्दिष्टे व उपक्रमही विशद केले. यावेळी सल्लागार समितीच्या समन्वयक डॉ. स्नेहल राजहंस, खजिनदार प्रा. संजय मुळीक, डॉ. रमेशकुमार गवळी, ए. एस. लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सी. बी. साळुंखे म्हणाले, गत चाळीस वर्षे कृष्णा महाविद्यालय कार्यरत आहे. हा परिसर उभा करण्यात जयवंतराव भोसले यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी जयवंतराव भोसले अध्यासन केंद्र सुरू होत आहे. यातून येत्या पाच वर्षांत दिवंगत भोसले यांचे मूर्त स्वरूपातील काम समाजाला पहायला मिळेल. त्यांच्या प्रत्येक कामाची नोंदणी, त्यातून झालेला उत्कर्ष, साहित्य, चित्रफिती, त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्वच क्षेत्रातील घटकापर्यंत पोहचून त्यांचे अनुभव व मुलाखती आदींचे संकलन व प्रकाशन केले जाणार आहे.
भोसले यांच्याविषयीच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे व दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन करणे या उद्दिष्टांसह आठवणींचा जागर, व्याख्याने, दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाबरोबर शेती, सहकार, जलसिंचन, शिक्षण, वैद्यकीय सेवा या विषयीचे संशोधन या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.