जावळी दोन महिन्यांच्या तुलनेत बाधितांचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:21+5:302021-03-15T04:35:21+5:30

कुडाळ : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत नव्याने कोरोना रुग्णांची भर पडली होती. मात्र, आरोग्य ...

Jawali slowed down for two months | जावळी दोन महिन्यांच्या तुलनेत बाधितांचा वेग मंदावला

जावळी दोन महिन्यांच्या तुलनेत बाधितांचा वेग मंदावला

कुडाळ : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत नव्याने कोरोना रुग्णांची भर पडली होती. मात्र, आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत मार्च महिन्यात तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. असे असले तरीही नागरिकांनी सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी आता वर्ष होत आले तरी सुरूच आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. यातच गेल्या दोन महिन्यांत जावळी तालुक्यातील वाढणारी रुग्णसंख्या या पंधरा दिवसांत आटोक्यात आली आहे. या पंधरवड्यात २२ जण बाधित आले असून, एकजण दगावला आहे. तसेच २९ जण सक्रिय रुग्ण आहेत. सुरुवातीच्या काळात वाढलेले मृत्यूचे प्रमाणही आता कमी झाले आहे. वाढणारी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.

तालुक्यात शासनाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजअखेर आरोग्य विभागातील ७९१, महसूल २५९, ग्रामपंचायत ४६०, वनविभाग ३२, तर कृषी विभागातील ४२ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचारी व प्राथमिक शिक्षकांना लसीकरण केलेले आहे. तसेच गृह विभागाच्या ४८ जण याचबरोबर ४५ ते ५९ वर्षे असणाऱ्या व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील सुमारे १३० सामान्य नागरिकांनाही लसीकरण झाले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आठवडे बाजार, लग्न समारंभ, यात्रा, धार्मिक कार्यक्रम या ठिकणी अनावश्यक गर्दी करू नये. कोरोना संपला असे न वागता मास्कचा वापर करावा. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे.

कोट :

तालुक्यात दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आरोग्य विभागाचे यावर बारकाईने लक्ष ठेवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही नागरिकांनी विनामास्क फिरू नये, सामाजिक आंतराचे पालन करावे आणि वारंवार साबणाने हात धुवावेत. अनावश्यक गर्दीही करू नये. स्वतः आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. सद्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५ ते ५९ वर्षे असणाऱ्या व्याधीग्रस्त आणि ६९ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू असून, आता सोमवार ते शनिवार संपूर्ण आठवडाभर लसीकरण होणार आहे.

- डॉ. भगवान मोहिते,

जावळी तालुका वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Jawali slowed down for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.