कायम शिक्षकासाठी जवळे ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Updated: January 9, 2015 00:00 IST2015-01-08T23:02:30+5:302015-01-09T00:00:42+5:30
पोलिसांची मध्यस्थी : खंडाळा पंचायत समितीवर धडकले

कायम शिक्षकासाठी जवळे ग्रामस्थ आक्रमक
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील जवळे येथील प्राथमिक शाळेत कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी जवळे ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. सात महिन्यांपासून मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने संतप्त ग्रामस्थ गुरुवारी खंडाळा पंचायत समितीवर धडकेल. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेतले.
याबाबत माहिती अशी की, जवळे येथे सात महिन्यांपासून कायमस्वरूपी शिक्षक मिळालेला नाही. यासंदर्भात ग्रामस्थ वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. तरीही पंचायत समितीतील शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ गुरुवारी पंचायत समितीत आले. मात्र, त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी गटविकास अधिकारीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
जवळे येथील एक शिक्षक पुढील शिक्षणाच्या कारणाने सात महिन्यांपासून रजेवर गेले होते. त्यामुळे चार वेळा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदन दिले होते. मात्र, शाळेवर शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत.
वास्तविक रजेवर गेलेले शिक्षक बुधवार, दि. ७ रोजी शाळेवर शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने शाळेवर हजर झाले होते; पण आपण जास्त दिवस शाळेत असणार नाही, असे वक्तव्य केल्याने कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, यासाठी ग्रामशिक्षण समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याची भूमिका घेतली.
पोलीस निरीक्षक अशोक शेळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, यशवंत साळुंखे यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवार, दि. ९ रोजी होणार असलेल्या मासिक सभेत निर्णय होईल, या अपेक्षेने आंदोलन स्थगित केले. शुक्रवारच्या सभेत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच अजय भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका जाधव, बापूराव पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)