जावली गटशिक्षणधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
By Admin | Updated: December 4, 2014 00:44 IST2014-12-04T00:37:19+5:302014-12-04T00:44:05+5:30
विभागीय आयुक्तांचे ‘सीईओ’ना आदेश

जावली गटशिक्षणधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
कुडाळ : जावळी तालुक्यातील प्राथिमक शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य केल्याचे समोर आल्यामुळे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करा, असे आदेश विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत. चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जावळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी शैक्षणिक वर्षात ज्या बदल्या केल्या आहेत, त्या नियमबाह्य असल्याची तक्रार कुसुंबी येथील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते साधू चिकणे यांनी केली होती. पदवीधर आणि उपशिक्षकांच्या चौदा बदल्या नियमबाह्य झाल्या. त्याचबरोबर ज्या २६ शिक्षकांना फरक बिले देण्यात येणार होती, त्यास जाणीवपूर्वक विलंब लावल्याचे समोर आले होते. या अनुषंगाने त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
परिणामी चिकणे यांनी २४ सप्टेंबर २0१४ रोजी पुणे विभागीय आयुक्त देशमुख यांच्याकडे तक्रार करत बदली आणि फरक बिल विलंबाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार देशमुख यांनी चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)