जावळीत सुनेत्रा शिंदे यांच्या सत्तेला हादरा
By Admin | Updated: February 9, 2015 00:42 IST2015-02-08T23:50:12+5:302015-02-09T00:42:11+5:30
संचालकांनी दाखविला हिसका : मध्यवर्ती बँक उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

जावळीत सुनेत्रा शिंदे यांच्या सत्तेला हादरा
कुडाळ : जावळी तालुका खरेदी-विक्री संघाची सत्ता सुनेत्रा शिंदे यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या मनमानी कारभार व वन मॅन शो कामकाजाला कंटाळलेल्या खरेदी-विक्री संघातील संचालकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर सहकारी संस्थांसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून सुनेत्रा शिंदे यांच्या विरोधात ठराव करून चांगलाच हिसका दाखविला.
प्रथम जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र सौरभ शिंदे यांचा पराभव तर आता संघातील विरोधी ठरावामुळे शिंदे यांच्या राजकीय सत्तेला चांगलाच हादरा बसला आहे. पुण्यात बसून राजकारण करणाऱ्या सुनेत्रा शिंदे यांनी कात्रज घाट ओलांडून येऊच नये, अशी राजकीय बांधणी तालुक्यातील राजकारणात झालेली पाहायला मिळत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत आतापर्यंत दिवंगत लालसिंगराव शिंदे, दिवंगत राजेंद्र शिंदे यांनी तालुक्यातून प्रतिनिधीत्व केले होते. राजेंद्र शिंदे यांच्या नंतर सुनेत्रा शिंदे यांना संधी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहकार शशिकांत शिंदेंना रुचत नाही म्हणणाऱ्यांना आमदार शिंदे यांनी सोसायटी मतदार संघातून जाऊन चांगलाच हिसका दाखविला.
पर्यायाने सुनेत्रा शिंदे यांना महिला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली. मात्र यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुनेत्रा शिंदेंना येता येऊ नये, या उद्देशानेच राष्ट्रवादी कामाला लागलेली पाहायला मिळत आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकी प्रचारावेळी कुडाळमध्ये सुनेत्रा शिंदे यांच्या घरी स्नेहभोजन करून गेले; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलेले पाहायला मिळाले नाही. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत आमदार शिंदे यांनी आक्रमक होऊन सोसायटी मतदार संघावर आपली पकड निर्माण केली आहे. खरेदी-विक्री संघातील ठरावही सुनेत्रा शिंदेंना घेता न आल्याने त्यांच्या बँकेच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे त्यांचे सहकारातील अस्तित्व देखील धोक्यात आले असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
संघातील शिंदेंच्या मनमानीला संचालकांचा चाप
जावळी खरेदी-विक्री संघात सुनेत्रा शिंदे यांच्या मनमानीला, हुकूमशाहीला संचालक कंटाळलेले होते. संचालकांनी विशेष सभेपूर्वीच चंद्रकांत तरडे (इनामदार) यांच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा शिंदे यांच्याविरोधात ठराव घेण्याची व्यूहरचना आखली व ती यशस्वी केली. मध्यवर्ती बँकेसाठी स. म. बेलोशे यांचा सुनेत्रा शिंदे यांच्या विरुद्ध मतदानातून (९-३) ठराव झाला. किसन वीर कारखान्यासाठी सुभाष फरांदे यांना नऊ मते तर सुनेत्रा शिंदे यांना तीन मते. प्रतापगड कारखान्यासाठी दत्तात्रय घाटगे यांचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. आमदार शिंदे समर्थकांनी या ठरावात बाजी मारून सुनेत्रा शिंदे यांचे राजकारणातील अस्तित्वच संपुष्टात आणले आहे.