जलयुक्त शिवाराचा पाच गावांत प्रारंभ
By Admin | Updated: January 3, 2015 00:00 IST2015-01-02T21:10:50+5:302015-01-03T00:00:59+5:30
प्रांताधिकारी यांची माहिती : बिदाल, तोंडले यांचाही समावेश

जलयुक्त शिवाराचा पाच गावांत प्रारंभ
म्हसवड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माण तालुक्यातील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाच गावांतील पाच कामांचा प्रारंभ एकात्मिक पाणलोट विकास, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व कोरडवाहू शेती अभियानांतर्गत निधीतून करण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माण तालुक्यात होणाऱ्या कामांची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर यावेळी उपस्थित होते.
मिनाज मुल्ला म्हणाले, ‘दुष्काळी भागांचा जलसंधारणाच्या माध्यमातून कायापालट करून माण तालुक्याला लागलेला दुष्काळी हा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी या अभियानामध्ये लोक सहभागाची गरज असून, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करू,’ असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
या अभियानामधील पहिल्या टप्प्यात पाच गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये थदाळे येथे कम्पॉर्टमेंट बंडिंगची कामे घेणार आहेत. बिदाल व तोंडले याठिकाणी नालाबांध दुरुस्ती तर कासारवाडी व बनगरवाडी येथे नवीन सिमेंट नालाबांध होणार आहेत.
पावसाचे पडणारे पाणी पूर्ण क्षमतेने भूगर्भातच जिरवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांचा तसेच स्वयंसेवी संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)