जाधवांचे कार्यालय राजेंसाठी म्हणे ‘लकी’
By Admin | Updated: September 25, 2014 23:26 IST2014-09-25T21:36:55+5:302014-09-25T23:26:30+5:30
तोफांचे नियोजन : खासदार-आमदारांचे प्रचारकेंद्र एकच

जाधवांचे कार्यालय राजेंसाठी म्हणे ‘लकी’
सागर गुजर- सातारा -लोकसभा निवडणुकीतील खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रचार कार्यालय आणि आता विधानसभा निवडणुकीतील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रचार कार्यालय एकच आहे. तालीम संघाशेजारील अमर जाधवांच्या घरातून प्रचाराच्या तोफांचे नियोजन केले जात आहे.
हे कार्यालय उदयनराजेंसाठी लकी ठरले. ते विक्रमी मताधिक्याने निवडून आले. आता जाधवांच्याच घराची निवड शिवेंद्रसिंहराजेंनीही प्रचार कार्यालयासाठी केली आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांनी अद्याप जागावाटपाचा निर्णय जाहीर केला नसला तरी शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीतर्फे सातारा-जावळी मतदारसंघाची उमेदवारी मिळणारच, अशी खात्री बाळगून कार्यालय सुरू केले. कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या कमानीवर लावलेल्या फ्लेक्स बोर्डवर एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तर दुसऱ्या बाजूला शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले व स्वत: शिवेंद्रसिंहराजेंचा फोटो आहे.
या कार्यालयात गाद्या व तक्के अंथरलेले पाहायला मिळतात. रोज सकाळी या ठिकाणी दिवसभराच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक होते. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंसह कार्यकर्ते बाहेर पडतात. दिवसभरात एक-दोन कार्यकर्तेच या कार्यालयात पाहायला मिळतात. उदयनराजेंनी प्रचार कार्यालयात संगणक ठेवले होते. सध्या मात्र अशी यंत्रणा इथे पाहायला मिळत नाही.