इवले श्वास दारिद्र्याचे गुलाम!
By Admin | Updated: July 16, 2015 21:27 IST2015-07-16T21:27:30+5:302015-07-16T21:27:30+5:30
कुटुंबाची ओढाताण : दुर्धर आजाराने पीडित कुणाल वायदंडेची करुण कहाणी

इवले श्वास दारिद्र्याचे गुलाम!
सागर गुजर - सातारा --कुठलीही व्याधी ‘गरीब वा श्रीमंत’ असा भेद समजून जडत नाही. व्याधीशी लढण्याची शक्ती प्रत्येक शरीराची वेगवेगळी असते, हे शास्त्र सांगते. शास्त्राच्या या नियमाशी अर्थशास्त्रही निगडीत असल्यानं साताऱ्यातल्या कुणाल अमोल वायदंडे या अवघ्या सहा वर्षांच्या दुर्धर आजाराने त्रासलेल्या मुलाच्या कुटुंबाचे अर्थकारणच बिघडलंय! इवल्या कुणालचे श्वास दारिद्र्याचे गुलाम होऊ नयेत म्हणून त्याच्या वडिलांना लोकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
साताऱ्यातल्या शनिवार पेठेत एका लहानशा खोलीत राहून चरितार्थ चालविणारे अमोल वायदंडे यांचे कुटुंब सध्या दुर्दैवाचे दशावतार सोसत आहे. पत्नी घरकाम करते. मोठा मुलगा कुणाल तर दुसरी मुलगी संस्कृती! दोघांनाही शिकवून मोठं करून हलाखीचं जगणं सुसह्य करण्याचं स्वप्न पाहात हे कुटुंब आशावादीपणे जीवन जगत असतानाच मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात कुणालला अचानकपणे उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला.
सलग सहा महिने सातत्याने हा त्रास सुरू राहिला. औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. त्यामुळे कुणालला बालरोगतज्ज्ञ उल्का ढवळे यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनीही त्याच्यावर उपचार केले; पण कुणालची प्रतिकारशक्तीच वाढत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुणालला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखविण्याची सूचना केली, त्यानुसार कुणाल पुण्याला नेण्यात आले. तपासणीअंती कुणालला ‘सिव्हियर कंबाइन्ड इम्पॅनोग्लोबीन डिसआॅर्डर’ हा रक्ताचा दुर्धर आजार असल्याचे निदान झाले. या आजारासाठी ‘इम्युनो ग्लोबोलिन’ हे इंजेक्शन घेणे जरुरीचे असून, त्याला कायमस्वरूपी ते द्यावे लागणार, असे तिथल्या डॉक्टरांनी सुचित केले. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून कुणालला महिन्याकाठी हे इंजेक्शन दिले जात आहे.
एका इंजेक्शनची छापील किंमत १६ हजार ५०० रुपये इतकी असून, आतापर्यंत अमोल वायदंडे यांनी जवळपास ४ लाख रुपये कुणालच्या उपचारासाठी खर्च केले आहेत. दानशूर मंडळींनी त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत केली तसेच काही महिला बचतगटांचे कर्जही त्यांनी यासाठी घेतले.
सध्याच्या परिस्थितीत अमोल वायदंडे मोलमजुरी करून महिन्याकाठी ४ हजार रुपये कमावतात; पण कुटुंबाचा चरितार्थ चालवून कुणालच्या उपचारासाठी एवढा खर्च करणे अमोल वायदंडे यांना झेपत नाही. समाजाने मनावर घेतले तर अमोल वायदंडेंसारख्या परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तींना परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळू शकते.
यांनी केली आर्थिक मदत
नगरसेवक जयवंत भोसले, हेरंब प्रतिष्ठानचे नाना इंदलकर, डॉ.अक्षय पवार, निशांत गवळी, अप्पू गवळी, दिवंगत राजू अवघडे, कमलाकर माळी, सचिन वायदंडे या साताऱ्यातील सुजाण लोकांनी कुणालच्या आजारपणासाठी अमोल वायदंडे यांना आर्थिक मदत केली.
काय आहे हा आजार?
‘सिव्हियर कंबाइन्ड इम्पुनोग्लोबीन’ हा आजार जन्मजात आहे. अत्यंत दुर्मिळ आजारांपैकी हा एक रक्ताचा आजार आहे. व्याधीग्रस्त व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारशक्तीच उरत नाही. त्यामुळे कुठलाही आजार त्याला तत्काळ जडतो. कुणालला आर्थिक मदतीसाठी सातारा येथील हेरंब प्रतिष्ठाण व व्हिजन फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
कुणालचे वजन झपाट्याने कमी होत होते. त्याचे शरीर उपचारांना साथही देत नसल्याने या जन्मजात आजारासाठी ‘इम्युनो ग्लोबोलिन’ हे इंजेक्शन सुरू केले आहे. ते त्याला किमान महिन्याकाठी दिले नाही, तर त्याची प्रकृती पूर्णपणे ढासळते.
- डॉ. उल्का ढवळे, बालरोगतज्ज्ञ