घोटभर पाण्यासाठी धडपड हाच त्यांचा दोष!
By Admin | Updated: April 3, 2016 23:42 IST2016-04-03T22:37:38+5:302016-04-03T23:42:00+5:30
महिन्यात सात बळी : मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

घोटभर पाण्यासाठी धडपड हाच त्यांचा दोष!
सातारा : पावसाचा आणि धरणांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात कधीकाळी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल, असे वाटलेही नसेल; पण यंदा मार्चपासूनच सातारकरांवर ही वेळ आली आहे. मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून तर तिघांचा पाण्याच्या शोधात विहिरतीत उतल्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. ‘घोटभर पाण्यासाठी धडपड...’ हा या सहा जणांचा दोष होता.
सातारा जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके बसायला लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस पडलेल्या गावांमधून ‘पाणी द्या...’ असा टाहो फोडला जात आहे.
गावागावातून टँकर, विंधन विहिरी, कूपनलिकांची मागणी केली जात असतानाच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी बैठक घेतली. या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळग्रस्तांच्या भावना पोटतिडकीने मांडल्या; पण प्रशासकीय अधिकारी ‘कागदी घोडे नाचवत दुष्काळ नाहीच’ असा आव आणत होते.
राज्याला पाणी अन् वीज देणाऱ्या पाटण तालुक्यातील असवले येथील तरुणी कमल उत्तम असवले ही वाल्मीकी पठारावर असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडली. त्यात तिचा मृत्यू झाला.
खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेला रवींद्र दीपक चव्हाण (वय २३, सध्या रा. मावळ्याचा दरा गुठाळे, ता. खंडाळा मूळ रा. बोरामणी, ता. जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथेही मंगल रवींद्र घाडगे यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता.
या काळात सर्वात दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी येथे घडली. पोपट शंकर सावंत यांचा कोरड्या विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला.
पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे या तरुणांचा मृत्यू असतानाच ग्रामीण भागात पाण्याचा शोध थांबलेला नाही. नवीन विहिरी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विहिरीत गाळ काढून पाण्याचा शोध घेतला जात आहे. पाणी शोधत असतानाही तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथे विहिरीतील गाळ काढत असताना अपघात होऊन सजन चंद्रभान पटेल (वय १९) याचा मृत्यू झाला. तर जावळी तालुक्यातील भामघर येथे क्रेन डोक्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे विहिर खोदताना यारी पडल्याने नंदकुमार कदम यांचा रविवार, दि. ३ रोजी मृत्यू झाला.
जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे सांगत असलेल्या प्रशासनाला या सहा जणांचे निधन दिसलेच नाही. दिसणारच कसे? कारण घोटभर पाण्यासाठी धडपड केली हाच त्यांचा दोष होता? असा सवाल तमाम जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)