कास परिसरात आठवडाभर पाऊस रमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:54+5:302021-09-13T04:38:54+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस मंगळवारी (दि. ७) रात्रीपासून पडत असणाऱ्या जोरदार वाऱ्यासह संततधार पावसामुळे नाले, ओढ्यांसह छोटे-मोठे धबधबे ...

कास परिसरात आठवडाभर पाऊस रमला
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस मंगळवारी (दि. ७) रात्रीपासून पडत असणाऱ्या जोरदार वाऱ्यासह संततधार पावसामुळे नाले, ओढ्यांसह छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत. कास तलावाचा सांडवा मोठ्या प्रमाणावर ओव्हरफ्लो झाला आहे. भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली-वजराई धबधबा खळाळून कोसळत आहे. दरम्यान, परिसरातील ओढे, नाले तुडुंब वाहत असल्याने उरमोडी व कण्हेर धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावरील या परिसरात अतिवृष्टी असते. गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच संततधार सुरू केल्याने परिसरातील जनजीवन गारठू लागले आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून जोरदार वारा व वाढलेला पावसाचा जोर यांमुळे थंडीतही प्रचंड वाढ होत आहे.
अतिवृष्टीच्या या डोंगरमाथ्यावर जून ते सप्टेंबर चार महिन्यांत ढग व धुक्यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते. आताही गेल्या आठ दिवसांचा कालावधी वगळता जूनपासून ऊन दुर्मीळ वेळा पडले आहे. सततच्या पावसाने आटण्याच्या मार्गावर असणारे झरे, ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा खळाळू लागल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. एकीव धबधबादेखील कोसळू लागला आहे. कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील शेतीस हा पाऊस पूरक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
चौकट
यंदाच्या वर्षी १७ जूनला कास तलाव भरून वाहू लागला होता. तेव्हापासून आजवरदेखील सलग तीन महिन्यांपासून कास तलावाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच आहे. गेल्या आठवडाभर पडत असलेल्या सततच्या जोरदार पावसाने सड्यावरून कोसळणारे पाणी यांमुळे कास तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन सांडव्यावरून एक फूट उंचीवरून पाणी वाहू लागले आहे.
१२कास
कास परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या कास तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.
(छाया - सागर चव्हाण)