'उदयसिंहां'चं पक्षप्रवेशाचं ठरलं! फक्त 'अजितदादां'च्या तारखेचं उरलं; कराड दौऱ्यात काय घडलं?
By प्रमोद सुकरे | Updated: March 12, 2025 23:16 IST2025-03-12T23:13:14+5:302025-03-12T23:16:21+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेत सुमारे १ तास वेळ दिला. २० मिनिटे बंद दाराआड चर्चाही केली तो उत्सुकतेचा विषय आहे.

'उदयसिंहां'चं पक्षप्रवेशाचं ठरलं! फक्त 'अजितदादां'च्या तारखेचं उरलं; कराड दौऱ्यात काय घडलं?
-प्रमोद सुकरे, कराड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जयंतीच्या निमित्ताने अभिवादन केले. पण त्यांच्या शासकीय दौऱ्यात नसतानाही त्यांनी काँग्रेसचे नेते अँड. उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेत सुमारे १ तास वेळ दिला. २० मिनिटे सभागृह बंद चर्चाही केली तो उत्सुकतेचा विषय आहे. त्यानंतर माध्यम प्रतिनिधिंनी उदयसिंह पाटलांचा प्रवेश कधी ?असे विचारल्यावर मी येथे सदिच्छा भेट द्यायला आलो होतो असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. पण अँड. उदयसिंह पाटलांनी मात्र पत्रकारांशी बोलताना 'आमचं राष्ट्रवादी प्रवेशाचं निश्चित ठरलं आहे, फक्त अजित पवारांच्या तारखेसाठी कार्यक्रमाचं उरलं आहे' असे सांगितले.त्यामुळे आता त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कराड दक्षिण काँग्रेसचे नेते व दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर) यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा गेल्या १५ दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच दिवंगत लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे वारसदार खासदार नितीन पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत अजित पवार व उदयसिंह पाटील यांची भेट घडवून आणली ती प्रसार माध्यमांपासून लपून राहिली नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चांना जोर आला.
अजित पवारांची २० मिनिटे बंददाराआड चर्चा
त्यातच बुधवारी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री पवार कराड दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांच्या शासकीय दौऱ्यात नसतानाही उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. कार्यकर्त्यांशी संवादही साधला आणि अँड. उदयसिंह पाटील व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी २० मिनिटे सभागृह बंद चर्चाही केली. ही चर्चा नेमकी काय झाली? या उत्सुकतेपोटी प्रसार माध्यमांनी अजित पवार यांना उदयसिंह पाटील यांचा प्रवेश कधी? असे छेडले पण त्यांनी मी फक्त सदिच्छा भेटीसाठी आलो होतो असे सांगत लगेच निरोप घेतला.
त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आपला मोर्चा पाटील यांच्याकडे वळवला आणि याच प्रश्नावर त्यांना छेडले. अगोदर आढेवेढे घेणाऱ्या उदयसिंह पाटलांनी अखेर 'हो आमचं प्रवेशाचं ठरलंय, आता फक्त अजित पवारांच्या तारखेसाठी उरलयं' तारीख मिळाली की आम्ही पक्षप्रवेश करू असे सांगून टाकले. त्यावेळी बंद सभागृहात नेमकी काय चर्चा झाली त्याचा सारांश समोर आला. आता उदयसिंह पाटीलांचा प्रवेशाचा मुहूर्त कधी निघणार? याचीच प्रतीक्षा उरलेली आहे.
उदयसिह पाटलांना नेमकी काय दिलीय ऑफर?
अजित पवारांनी कोयना बँकेला भेट दिली. पाहुणचारात त्यांनी 'खाल्ले 'कोयने'चे पेढे अन 'रयत'ची साखर, पण 'उदयसिंहां'ना नेमकी काय दिलीय ऑफर?' याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत उदयसिंह पाटील यांनी मी काही मागणी केलेली नाही आणि त्यांनी काही शब्द दिलेला नाही असे जरी म्हटले असले तरी, विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे त्यांच्याच रयत संघटनेचे कार्यकर्ते खाजगीत सांगत आहेत.
पक्षप्रवेश अधिवेशनापूर्वी की नंतर?
सध्या राज्य सरकारचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अजित पवार त्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी की अधिवेशन संपल्यानंतर ते उदयसिंह पाटलांना कार्यक्रमाची तारीख देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजूनही मी काँग्रेसमध्येच अजित पवारांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींनी उदयसिंह पाटील यांना आज काँग्रेसचा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेवर तुमचं नाव आहे. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहात का? याबाबत छेडले असता अजून मी काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे कार्यक्रमाला जाणार असलेचे सांगितले. त्यावेळी एकच हशा पिकला.