कऱ्हाडच्या ‘डीबी’त म्हणे मस्त चाललंय !-- काय (बी) घडतंय
By Admin | Updated: November 7, 2014 23:30 IST2014-11-07T22:31:43+5:302014-11-07T23:30:29+5:30
पेट्रोलिंगचा ‘वन-वे’ कारभार : ना फटके, ना झटके; ‘गुन्हे शाखे’त फक्त शांतता--पोलीस ठाण्यात

कऱ्हाडच्या ‘डीबी’त म्हणे मस्त चाललंय !-- काय (बी) घडतंय
संजय पाटील - कऱ्हाड ‘सोनारानंच कान टोचावं,’ असं म्हणतात़ कऱ्हाडच्या ‘डीबी’तही पूर्वी गुन्हेगारांचे कान टोचणारे अधिकारी होते़ एखादा गुन्हेगार ‘डीबी’पर्यंत पोहोचला तर काही बदलो ना बदलो त्याचा चेहरा मात्र नक्कीच बदलायचा़ चेहऱ्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी थोडी सूजही चढायची़ तेवढा ‘प्रसाद’ अधिकाऱ्यांकडून हमखास मिळायचा़ सध्या मात्र याच्या उलट चाललंय़ कऱ्हाडची ‘डीबी’ एवढी शांतताप्रिय बनलीय की ‘डीबी’च्या कक्षात सत्यनारायणाची पूजा घालणच बाकी राहिलंय़
काहीजण अगदीच ‘सांगकाम्या’ असतात़ काम सांगीतलं की, मान हलवायची, एवढंच त्यांना माहीत़ पडत्या फळाची आज्ञा घेत असे ‘हो नाम्या’ कामाला लागतात़ कऱ्हाडच्या गुन्हे शाखेतही पूर्वी अशा ‘हो नाम्यां’ची चलती होती; पण तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विकास धस यांच्या ‘एन्ट्री’नंतर काही जणांना गुन्हे शाखेला रामराम ठोकावा लागला़
सहायक निरीक्षक धस यांनी खऱ्या अर्थाने ‘टीम डीबी’ तयार केली़ पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक आणि सहायक निरीक्षक धस यांच्यातील समन्वयामुळे ‘डीबी’चा रागरंग बदलला़ ही शाखा त्यावेळी चांगलीच ‘फॉर्मात’ आली़ अधिकाऱ्यांनी सांगायच आणि कर्मचाऱ्यांनी करून दाखवायचं, असं कामाचं सूत्र या शाखेत जुळलं़ गुन्हेगारांवरील वचक असो, गुन्ह्यांची उकल असो; अथवा गुन्हेगारी कारवाया थोपवणं असो़ कोणत्याच बाबतीत त्यावेळी ही शाखा नमली नव्हती़ अट्टल गुन्हेगारांच्या गळ्यात घंटा बांधण्याचं, त्यांना मुसक्या घालण्याचं काम त्यावेळी याच शाखेनं केलं; पण सहायक निरीक्षक धस यांच्या बदलीनंतर ही शाखा पुरती ढेपाळली़ धस यांच्यानंतर सहायक निरीक्षक चंद्रकांत ठाकूर यांनी गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला़ मुळातच सहायक निरीक्षक ठाकूर हे मवाळ भूमिकेचे़ त्यातच त्यांचा कागदी घोड्यांवर जोऱ त्यामुळे त्यांच्या कागदी घोड्यांना गुन्हेगारांनी जुमानले नाही़ अधिकारीच मवाळ असल्याने कर्मचाऱ्यांनीही त्यावेळी हात आखडता घेतला़ परिणामी, दिवसेंदिवस ‘डीबी’चा दबदबा कमी होत गेला़ कमावलं ते गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली़ चंद्रकांत ठाकूर यांच्यानंतर पद्भार स्वीकारलेल्या धनाजी पिसाळ यांनी काही प्रमाणात गुन्हे शाखेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़
गत काही महिन्यांत ‘डीबी’त जिवंतपणा आलाय; पण हा जिवंतपणा कक्षापुरताच मर्यादित राहिल्याचं दिसत़ आहे. चर्चा व्हावी, असं एकही काम या कक्षाकडून गत अनेक दिवसांपासून झालेलं नाही़ येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दैनंदिन काम आणि कर्मचाऱ्यांनी ‘पेट्रोलिंग’ करायचं़ सध्या एवढंच ‘डीबी’चा एककलमी म्हणजेच ‘वन-वे’
कारभार चालला असल्याचे दिसून
येत आहे.
मोठ्या कारवाईची अपेक्षा...
तत्कालीन उपनिरीक्षक सुनील दोरगे यांच्या कालावधीत या शाखेला ‘खंडणीविरोधी’ पथक म्हटलं जायचं. त्यानंतर हे नाव बदलून ‘गुंडाविरोधी’ पथक म्हटलं जाऊ लागलं. कालांतराने हे नावही मागं पडलं. सहायक निरीक्षक विकास धस यांच्या कालावधीत ही शाखा ‘गुन्हे प्रकटीकरण’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सध्या मात्र ‘गुन्हे शाखा’ असंच या शाखेला संबोधलं जातंय. गेल्या काही महिन्यांत या शाखेने लहान-मोठ्या कारवाया केल्या आहेत; पण त्याहीपेक्षा मोठ्या कारवाईची, कामगिरीची अपेक्षा नागरिकांना या शाखेकडून आहे.